कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशोब द्या !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या काळात झालेला एकूण खर्च, थकीत असलेली देणी याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असे पत्र महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी भांडार विभागाला दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आरोग्य विभागासाठी दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी दिले होते. दरम्यान डॉ. पाडळकर यांचा अतिरिक्त पदभार नुकताच काढण्यात आला आहे. त्यानंतर डॉ. मंडलेचा यांनी आता खर्चाचा हिशेब मागितला आहे.

कोरोना संसर्ग कमी करण्यासोबतच पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांवर उपचार करणे, तसेच रुग्णांना जेवण देणे यासह विविध कामांवर महापालिकेने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. जिल्हा नियोजन समिती व आपत्ती व्यवस्थापनातून महापालिकेला ५५ कोटी रुपये मिळाले आहेत. असे असले तरी महापालिकेने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे सुमारे ६६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. कोरोना काळात काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. दरम्यान आता खर्चाच्या हिशेबावरून महापालिकेत वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महापालिकेत शासनाने डॉ. पारस मंडलेचा यांची प्रतिनियुक्तीवर बदली केली होती. त्यानुसार त्यांच्याकडे पदभार देणे अपेक्षीत असताना प्रशासक पांडेय यांनी प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्याकडे कोरोनासंबधी कामे कायम ठेवली तर मंडलेचा यांच्याकडे आरोग्य केंद्रांची जबाबदारी देण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून दोन आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत काम सुरू होते. चार दिवसांपूर्वी डॉ. मंडलेचा यांच्याकडे पूर्ण पदभार देत, डॉ. पाडळकर यांचा पदभार पांडेय यांनी काढला. त्यानंतर मंडलेचा यांनी भांडार विभागाला पत्र देत कोरोना काळातील खर्चाचा हिशेब मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोट्यवधींची बिले थकीत

दरम्यान कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले गेल्या सात-आठ महिन्यांपासून थकीत आहेत. हे कंत्राटदार महापालिकेत खेट्या मारत आहेत. डॉ. मंडलेच्या यांच्याकडे संपूर्ण पदभार येताच कंत्राटदार त्यांच्याकडे थकीत बिलाची मागणी करत आहेत. कोणत्या कामावर किती खर्च झाला आहे, याची अद्याप मला माहिती नाही, अशी भूमिका घेत मंडलेचा यांनी डॉ. पाडळकर यांच्याकडून माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Leave a Comment