शांत असूनही बेदरकारपणे खेळी रचणारा धोनी कायम लक्षात राहील..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MSD स्पेशल | तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारंच..!! मराठीतील ही प्रसिद्ध उक्ती भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला चपखल लागू पडते. महेंद्रसिंग धोनी – कॅप्टन कूल, सर्वोत्तम फिनिशर, खेळाडूंचा कर्णधार, चपळ यष्टीरक्षक, नवोदितांचा मार्गदर्शक आणि चांगला माणूससुद्धा. ही मिळवलेली सगळी विशेषणं धोणीच्या क्रिकेट कारकिर्दीची साक्ष देतात.

New Zealand v India - International T20 Game 1

क्रिकेटचा प्रकार कोणताही असो, धोनी मैदानावर आहे म्हणजे मॅच आपल्या हातात आहे हे भारतीयांसोबत प्रतिस्पर्धी संघालाही माहीत असायचं. कारण एकच – धोनीचा स्वतःसोबत खेळाडूंवर असलेला विश्वास आणि जिंकण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द. साडेतीनशे एकदिवसीय, नव्वद कसोटी, ९८ ट्वेन्टी ट्वेन्टी आणि १५० हुन अधिक आयपीएल सामने खेळलेल्या धोनीची कारकीर्द जेमतेम १५ वर्षांची. या १५ वर्षांत धोनीने भारताला सगळंच दिलं. आयसीसीच्या मानाच्या ३ ट्रॉफी मिळवून दिल्या. संघातील दीड डझन खेळाडू आणि संघाबाहेरील शेकडो खेळाडूंना मार्गदर्शन करत पुढं जायला शिकवलं. यशस्वी खेळाडू असलो तरी आपण दीर्घकाळ खेळून संघातील तरुणांची जागा अडवून ठेवता कामा नये हे गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत ठणकावून सांगण्याची किमया करणारा धोनीसारखा स्पष्टवक्ता पण तितकाच जबाबदार खेळाडू निराळाच. अपयशी खेळाडूंवर विश्वास दाखवून त्यांना उभं राहायला धोनीनं शिकवलं – याचं उत्तम उदाहरण रोहित शर्मा, शिखर धवन आणि रवींद्र जडेजा आहेत. आज भारताच्या संघात या तिघांचं जे स्थान आहे त्याला अप्रत्यक्षपणे कारणीभूत धोनीचं..!! जागतिक खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळतात तेव्हा खेळाचा सर्वोत्तम आनंद घेतोय असं म्हणतात ते उगीच नाही..!!IMG-20200816-WA0003[1]

प्रत्यक्ष जीवनात फुटबॉलची आवड असलेला धोनी अपघाताने क्रिकेटमध्ये आला आणि क्रिकेटचाच होऊन गेला. धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बांगलादेशविरुद्ध रनआऊटने झाली आणि शेवट न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रनआऊटनेच झाला. या दोन रनआऊटच्या दरम्यान धोनीने फलंदाजी करताना १६ हजार धावांचा रतीब घातलाय तर ७०० हून अधिक फलंदाजांना यष्टीमागूनच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. श्रीलंकेविरुद्धची १८३ धावांची खेळी असो किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावेळी जोगिंदर शर्माला दिलेलं शेवटचं षटक, २०११ वर्ल्डकपला युवराजच्या आधी यायचा निर्णय असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रवीचंद्रन अश्विनला दिलेलं शेवटचं षटक – धोनीच्या निर्णय नेहमीच तगडा राहिला.ms-4

धोनीला निरोपाचा सामना खेळायला मिळावा अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र शांत स्वभावाच्या धोनीने कोणताही गाजावाजा न करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचं आपलं सोपस्कर पूर्ण करुन टाकलं. ६ विश्वचषक खेळून विश्वचषक जिंकायचं सचिन तेंडुलकरचं लांबलेलं स्वप्न धोनीने पूर्ण करुन दिलं, बलाढ्य संघांशी लढताना संघातील युवा खेळाडूंना तुम्ही जगात भारी आहात हा विश्वास धोनीने दिला, मैदानावर डोकं शांत ठेवून निर्णय आणि रिस्क कशी घ्यायची याचा वस्तुपाठच धोनीने घालून दिला – क्रिकेटचा देव बनण्याची त्याची महत्वकांक्षा नव्हतीच कधी, पण क्रिकेटच्या देवाला खुश करण्याचं काम मात्र त्यानं करुनच दाखवलं..!!

माही, क्रिकेटमधून तू निवृत्ती घेतली असली तरी तुझ्या प्रेरणेने जीवनाच्या मैदानावरील आमची इनिंग आम्ही कायमच जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न करु. अगदी तुझ्यासारखचं शांत डोक्याने..!! मिस यू थाला, अलविदा !!

Leave a Comment