हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तर केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत अशी टीका शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून केली आहे. शिवसेनेनं सामनातून राहुल गांधींचे अभिभाषण आणि केंद्राच्या अर्थसंकल्पावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
2014 च्या प्रचारात दिलेली वचने केंद्र सरकारच्या स्मरणात नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख, महागाई खतम करणार, इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. पाकव्याप्त कश्मीर पुन्हा परत आणणार, दोन कोटी बेरोजगारांना प्रत्येक वर्षी नोकया या वचनांची आठवण करून देणारे राष्ट्रद्रोही ठरवले जातात असे शिवसेनेनं म्हंटल.
2014 सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर 35 गोळ्या झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हेसुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले.
देशासाठी बलिदान, रक्त सांडणे, त्याग वगैरे गोष्टींशी सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा संबंध राहिलेला नाही. दोन-पाच उद्योगपतीभोवतीच देशाचे चक्र फिरते आहे. सरकार म्हणजे काय? याचा विसर पडला आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच जणू मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. पुलवामा घडले ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संरक्षण व्यवस्थेची मोठी चूक वाटत नाही. हे का घडले? असे विचारणारे पाकचे एजंट ठरविले जातात असेही शिवसेनेनं म्हंटल.