अज्ञात व्यक्तीने पार्किंगमधील मोटारसायकल जाळल्या, CCTV फुटेज आले समोर

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यादरम्यान नागपूर जिल्ह्यातील जरीपटका भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 25 एप्रिल रोजी एका घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 दुचाकी एका अज्ञात व्यक्तीने जाळल्या आहेत. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून जरीपटका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यामुळे घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी जाळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आरोपीचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
नागपूरच्या जरीपटका भागातील एका घराच्या पार्किंगमध्ये एक्टिव्हा कंपनीच्या दुचाकी उभ्या असलेल्या या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. यादरम्यान काही वेळाने तिथे एक तरुण तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून येतो. यानंतर तो गाड्यांवर कुठलातरी ज्वलनशील पदार्थ टाकतो आणि काडीपेटीने तो गाड्यांना आग लावतो. यानंतर आगीचा भडका झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

25 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वसंतशाह चौक जरीपटका परिसरातील दर्शनलाल किंगराणी यांच्या पार्किंगमधील चार अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल अंदाजे 20 ते 22 वर्षाच्या आरोपीने आग लावून खाजगी मालमत्तेचे नुकसान केले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात भादंवी 427 आणि 435 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा आरोपी फरार असून जरीपटका पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.