तीन हजार कोटींच्या उलाढालाने दिवाळी साजरी

औरंगाबाद – गेल्या दिड ते पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या चैनीच्या वस्तू खरेदी करता आल्या नव्हत्या. मात्र यावर्षी नागरिकांनी दणक्यात खरेदी करून दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत बाजारात मिठाई, फटाके, नवीन कपडे, घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टीव्ही, वॉशिंग मशीन यासारख्या असंख्य वस्तूंची शहरवासीयांनी मनसोक्त खरेदी केली आहे. यामुळे बाजारपेठेत अडीच ते तीन हजार कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून ठप्प झालेली अर्थव्यवस्था ऑक्‍टोबरपासून पुन्हा रुळावर आली. हळूहळू बाजारात उत्साह देखील संचारला. दिवाळी तो आणखीनच द्विगुणित झाला. ग्राहकांचे पावले मोठ्या संख्येने बाजाराकडे वळू लागल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. बाजारपेठ व बहुतांश दुकाने वस्तूंनी ओसंडून वाहत होती. ग्राहकांमध्ये देखील खरेदीचा उत्साह दिसून येत होता. नवीन कपड्या पासून ते सर्वच मालाला उठाव दिसून आला. त्यातही या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांनी चैनीच्या वस्तू खरेदीकडे अधिक कल दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सुकामेवा, उंची चीजवस्तू, मिठाई, घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागदागिने खरेदीकडे देखील लोकांचा मोठा कल दिसला. तसेच नवीन कपडे, बूट चप्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन वाहने, संगणक, मोबाईल आदी खरेदी करत ग्राहकांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. भाऊबीज होऊन गेली तरीही बाजारपेठेत अजूनही खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत. आहे बाजारपेठेत दिवाळी सणाच्या कार्यकाळात दररोज 300 ते 400 कोटींची उलाढाल होत होती. आतापर्यंत आठ दिवसात जवळपास तीन हजार कोटींची उलाढाल झाली असल्याचे जगन्नाथ काळे यांनी स्पष्ट केले.