वटपौर्णिमा उत्साहात साजरी; सुहासिनींनी विधिवत केली पूजा

औरंगाबाद | शहरातील विविध भागासह ग्रामीण भागातही गुरुवारी मोठ्या उत्साहात वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे सावट असल्याने काही ठिकाणी महिलांनी मास्क लावून वडाची पूजा केली. कोरोनाचे नियम केल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. कोरोनाचे नियम शिथिल केल्याने यंदा महिलांना मैत्रिणी सोबत वेळ घालवता आला. दरवर्षीप्रमाणे सजुन-सवरून पूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू वाण देऊन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. पहाटे 3 वाजून 32 मिनिटापासून वड सावित्री पौर्णिमेला आरंभ झाला असून रात्री बारा वाजेपर्यंत संपेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिलांनी वडाची प्रतिमा किंवा रोप आणून पूजन केले. तर काहींनी आपल्या घराजवळच असलेल्या वटवृक्षाची पूजा करून व्रतआचरणाचा संकल्प केला. त्यानंतर देवतांचे आवाहन करून दूध, दही, मध आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण केले. तसेच पाणी अर्पण करून हळदी-कुंकू, फुले, फळे, अर्पण केले. यावेळी धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करुन प्रसादाचे वाटप केले.

पारंपारिक वेशभूषेत खुप दिवसानंतर घराबाहेर मैत्रिणींना भेटता आल्यामुळे काही महिलांना सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. वटसावित्री पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक सण असून, यमा कडून सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तो दिवस म्हणजेच ज्येष्ठपौर्णिमा. अशी अख्यायिका सांगितली जाते. पतीच्या रक्षणाकरिता तसेच जन्मोनजन्मी हाच पती मिळावा म्हणूनही वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पर्यावरणाच्या दृष्टीनेही वडाचे महत्व विशेष आहे. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक पूजेचा हेतू आहे.