Tuesday, June 6, 2023

शेतकरी, कामगार यांना सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आज देशव्यापी ‘स्पीक अप इंडिया’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारला काही सूचना दिल्या होत्या. देशभरात कांग्रेस च्या नेत्यांनी या अभियानाला प्रतिसाद देत आपले व्हिडीओ सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक ट्विटरवर शेअर केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आहे. शेतकरी, कामगार यांना केंद्र सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत अशी मागणी चव्हाण यांनीही फेसबुकवर एक व्हिडीओ शेयर करत केंद्र सरकारकडे केली आहे.

आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोशल मीडियावर एक देशव्यापी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकारात्मक होते. यामध्ये पंतप्रधानांना काही विनंती केल्या होत्या. त्यातील सर्वात महत्वाची विनंती म्हणजे, शेतमजूर, गरीब, कामगार यांना ताबडतोब १०,००० रु द्यावेत आणि नंतर सहा महिने दरमहा ७ हजार ५०० रु द्यावेत.” अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ही  मागणी उचलून धरली आहे.

तसेच, सर्व कामगारांना सरकारच्या खजिन्यातून खर्च करून घरी पोहोचवावे, तसेच मनरेगा च्या उपक्रमांअंतर्गत मजुरांसाठी १०० दिवसांच्या रोजगार योजनेत वाढ करीत २०० दिवस करावी अशा मागण्या करण्यात आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओद्वारे या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारला घेरण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हे आंदोलन केले होते. याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.