केंद्रीय पथकाचा महापालिका कर्मचा-यांना दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | केंद्राच्या स्वच्छता मिशनअंतर्गत औरंगाबाद महापालिकेने केलेल्या कामगिरीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाकडून शहराचे स्वच्छ सर्वेक्षण केले जात आहे. या पथकाने शुक्रवारी पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांनाच दणका दिला. नंतर तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, आम्हाला आमचे स्वतंत्र फिरु द्या. नागरिकांशी संवाद साधू द्या, असे म्हणत या पथकाने पालिकेच्या अधिकार्‍यांना दूरच ठेवले.

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात कचरामुक्त शहर ही संकल्पना राबवली जात आहे. त्यानुसार शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाचे दोन दिवसांपासून काम सुरु आहे. गुरुवारी या पथकाने व्यावसायिक भागात जाऊन पाहणी केली. व्यावसायिक भागाला जोडून असलेल्या निवासी भागात देखील जाऊन पथकाने तेथील नागरिकांशी स्वच्छतेविषयक बाबींवर संवाद साधला.

शुक्रवारी मात्र या पथकाने निवासी क्षेत्रातच पाहणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार पथकाने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकार्‍यांना आपण कांचनवाडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी येणार आहोत, असे सांगितले. तेव्हा पालिकेने त्या ठिकाणी जय्यत तयारी केली. सकाळपासूनच ठराविक कर्मचारी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर बसवले होते. मात्र सायंकाळी पाच वाजले तरी केंद्रीय पथक तेथे आलेच नाही. दरम्यान, हे पथक निवासी क्षेत्रात पाहणी करण्यासाठी गेले होते. पथक पालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांना सोबत न घेता शहरभर फिरत असल्याने पालिका अधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Leave a Comment