पुणे प्रतिनिधी | भीमा कोरेगाव क्रांती दिनाच्या निमित्ताने भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर रावण डिसेंबर मधे पुण्यात येणार असल्याचे समजत आहे. चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली भीम आर्मी पुणे शहर जिल्हा शाखेच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे महिला प्रमुख निमा अडगुळे, सिताराम गंगावणे, भिमराव कांबळे आदी उपस्थित होते.
इतर महत्वाचे –
चंद्रशेखर रावण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत असून, ३० डिसेंबर रोजी ते पुणे दौर्यावर येणार आहेत. पुणे येथील एस.एस.पी.एम.एस मैदानात राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग, संघटनेचे नेते मंजीत नोटीयाल, कमलसिंग वालीया, सोलापूर येथील इतिहासाचे अभ्यासक सरफराज शेख, इतिहासतज्ञ अमोल मीटकरी आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच ३१ डिसेंबरला पुणे विद्यापीठात ‘संवाद आंबेडकरी तरूणाईशी’ हा कार्यक्रम होणार असून, यावेळी विद्यार्थी व तरूण वर्गाशी ऍड. चंद्रशेखर रावण थेट संवाद साधणार आहेत व चळवळीच्या विविध विषयावर चर्चा करणार आहेत. १ जानेवारीला भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करून हेलीकॉप्टरच्या माध्यमातून विजयी स्तंभावर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.