पाटण | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्या पूरग्रस्तांच्या दाैऱ्यात कोयनानगर स्थलांतरित पूरग्रस्तांनी शाैचालयाची गैरसोय होत असल्याचे सांगितले. पूरग्रस्तांची ही गैरसोय अवघ्या काही तासांतच स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या कुटुंबियांनी दूर केली आहे, डाॅ. सुरेश भोसले कुटुबियांच्या या दातृत्वाने पूरग्रस्तांनी आभार मानले.
पाटण तालुक्यातील अनेक गावात गेल्या आठवड्यात भूस्खलन, दरडी कोसळणे या दुर्घटनेत अनेकांना जीव गमावावा लागला. अनेकजण कृष्णा हाॅस्पीटलमध्येच उपचार घेत आहेत. अशावेळी स्थलांतरीत मिरगाव, ढोकावळे या लोकांना कोयनानगर येथील शाळेत ठेवण्यात आले आहे. मात्र लोकांची संख्या जास्त आणि शाैचालये नसल्याने गैरसोय होत होती. यावर कृष्णा उद्योग समूहाचे स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या कुटुंबातील डॉ. सुरेश भोसले, डाॅ. अतुल भोसले व विनायक भोसले यांनी अवघ्या 24 तासात कोयनानगर येथे स्वच्छतागृहे उभारून दिलेली आहेत.
विनायक भोसले यांच्या सूचनेनुसार हिंदू एकता समितीचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, राहूल यादव, धीरज कदम यांनी स्वतः जागेची पाहणी केली. त्यानंतर कोयनानगर शाळेजवळ स्थलांतरीत लोकांसाठी दोन बाथरूम व स्वच्छतागृह उभारली आहेत. भोसले कुटुंबियांनी गैरसोय दूर केल्याने पूरग्रस्तांनी आभार मानले आहे.