“ज्याला घ्यायचीच आहे तो कुठेही जाऊन घेणारच, त्यामुळे…”; वाईनच्या निर्णयाबाबत भुजबळांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंत्रिमंडळाच्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. “आख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचं काम आहे, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नुकत्याच वाईन विक्रीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात राज्य सरकारने शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठीचाच आहे. या ठिकाणी भाजपमधील लोक विरोध करत आहेत. मात्र, मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मद्य घरात ठेवायला परवानगी दिली आहे. बार उघडायला परवानगी दिली आहे.

ज्या वाईनला आख्ख्या जगाने हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्या वाईनबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. मात्र, भाजपवाल्यांकडून काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचे हे काही बरोबर आहे, असे भुजबळ यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.