हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह कस असावं याबाबत माहिती देत संभाजीराजे यांनी तमाम जनतेला बोधचिन्ह सुचवण्याचे आवाहन केले आहे. तसेच यासाठी त्यांनी whatsapp number दिला असून त्यावर तमाम जनतेला बोधचिन्ह बाबत त्यांच्या मनातील कल्पना सांगण्यास सांगितले आहे. फेसबुक पोस्टद्वारे संभाजीराजेंनी याबाबत आवाहन केले आहे….
#स्वराज्य चे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारावे… विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह ( लोगो ) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे, अशी आमची इच्छा आहे.
हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. तरी, कल्पक मंडळींना आमचे आवाहन आहे की, असे बोधचिन्ह तयार करून खाली दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबर वरती पाठवून द्यावे. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.
बोधचिन्ह पाठविण्यासाठी तात्पुरता व्हॉट्स ॲप नंबर : 9403788699
( कृपया फक्त बोधचिन्ह करिता हा नंबर आहे याची नोंद घ्यावी. )
( या नंबर वरती बोधचिन्ह पाठवत असताना आपले नाव, पत्ता व व्यवसाय ही माहिती सोबत पाठवावी. )
असे असावे बोधचिन्ह-
• बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.
• बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.
• एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.
• एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.
• कृपया जास्तीतजास्त सोमवार, दि. २० जून पर्यंत बोधचिन्ह पाठवून सहकार्य करावे.