हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याअगोदरच भाजपकडून टीकास्त्र डागण्यात आलेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा हा दौरा म्हणजे फक्त फोटोबाजीसाठीचा आहे'” अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.
चक्री वादळाचा सर्वाधिक फटका हा कोकणला बसला आहे. त्यामुळे या भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अगोदर भाजपच्या नेत्यांकडून सुरु करण्यात आलेला आहे. या दौऱ्यातून भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. आज भाजपचे आमदार नितेश राणेंनीही मुख्यमंत्री ठाकरेंवर टीकास्त्र डागले. नितेश राणेंनी यापूर्वीही मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर टीका केली होती. ‘हा तर पनवतींचा बाप आहे’, असा उल्लेख करणारे ट्विट राणेंनी केले होते. यानंतर आता राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमच्या मनगटात खरंच जर हिम्मत असेल तर तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा देऊन दाखवा. आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी देऊन पहा. मग बघा आम्ही सर्व जबाबदारी कशी पार पडतो. राज्यासाठी निधी आणून दाखवू,” असेही राणे यांनी म्हंटल आहे.