बाळाचं स्वातंत्र्य आणि आपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बालदिन विशेष | स्नेहा चामले

‘ऑगस्ट’ महिना हा भारतीय स्वातंत्र्याचा महिना म्हणून आपल्याकडे सर्वज्ञात आहे. याच महिन्यात ४ ऑगस्ट, २००९ रोजी भारतातील ०६ ते १४ या वयोगटासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची कायदेशीर व्यवस्था आपण निर्माण केली गेली. या महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ३१ ऑगस्ट हा बाल-स्वातंत्र्याचा ध्वज विश्वात फडकवणाऱ्या थोर विदुषी मादाम माँटेसरी यांचा जन्मदिवस आणि माँटेसरी बाईंची शिक्षणविषयक तत्त्वे भारतीय परिस्थितीत व्यवहारात उतरवण्याचे कार्य करणाऱ्या ताराबाई मोडक यांचा हा पुण्यतिथीचा दिवस. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेने म्हणूनच हा दिवस ‘बालस्वातंत्र्य दिन’ म्हणून जाहीर केला आहे.

मुल जेंव्हा जन्माला येत तेंव्हापासूनच त्याला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. मुलं लहान असतानापासून आपण त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि पालक म्हणून आपल्या डोक्यात असलेल्या गोष्टी आपण मुलांना सांगत असतो. मुलांचे स्वातंत्र्य हे फार महत्वाचे असते पण आपण याकडे कायम दुर्लक्ष करत असतो. आपण मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असतो. समाजात प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य हवं असत आणि ते जन्मजात मिळालेलं असतच, परंतु आपण लहान मुलांचा याबाबतीत कसलाही विचार करत नाहीत. मुळात त्यांना स्वातंत्र्य आहे, हेच आपल्याला स्पष्ट झालेले दिसून येत नाहीत वा तो विचार आपल्या मनात देखील येत नाही. मानवाचा भविष्यकाळ त्याच्या बाल अवस्थेतून आकारास येत असतो. त्याच्या हिताच्या दृष्टीने येणाऱ्या पिढीचे जतन करणे, तिची जोपासना करणे आणि नवजीवनाला तिला तयार करणे हे प्रत्येक प्रौढ पिढीचं आद्यकर्तव्य आहे.

मुलं समजून घेतल्याशिवाय त्यांच्या शिक्षणाचा विचार करताच येणार नाही हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मुलांना त्यांचे स्वातंत्र्य दिलं गेल पाहिजे म्हणजे हवं ते करू देणं अस नाही तर मुलांना स्वतःचे निर्णय घेऊ देणे जसे की, आज कुठला पोशाख परिधान करणार आहे, बाजारातून कुठली भाजी घेऊन यायची, तुला बाहेर यायचे आहे का? आज आपल्याकडे शेजारच बाळ येणार आहे तुला त्याच्या सोबत खेळायला आवडेल का? अशा छोट-छोट्या गोष्टी मुलांना करू देणे आणि त्यांचे मत विचारात घेणे हे मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरते. मुल अगदी लहान असते तेंव्हापासूनच आपण त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो असे वास्तविक समाजात दिसून येते. मुलांचे मत विचारात घेतले जात नाही. आपण सहजच बोलून जातो की त्याला काय कळत तो लहान आहे त्याला काय विचारायचं आहे. अशा प्रकारे जेंव्हा आपण बोलत असतो ते मुलांच्या विकासासाठी ते धोकादायक असत. मुलांना खरंच वाटत की आपल्याला खरंच काही कळत नाही आपण नॉर्मल नाही आहोत आणि हाच विचार घेऊन ते जगत असतात. खर तर मुलांना सर्व गोष्टी स्वतंत्रपणे करू द्याव्यात. फक्त त्याचा गैरवापर होत नाही ना याकडे आपण पालक म्हणून लक्ष्य द्यावे. मुलं अनुभवातून अनेक गोष्टी शिकत असतात आपण त्यांच्यावर टीका न करता, त्यांच्या चुका न काढता त्यांचे कौतुक करावे जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यातूनच त्यांचा आत्मसन्मान देखील जपला जाईल. आपण जितका सकारात्मक विचार करु तितका मुलांमध्ये बदल होत असतो आणि मग त्यांचा विकास होत असतो, जर आपण नकारात्मक विचार करत असू तर त्यांना आपण तो चुकीचा कसा आहे, वाईट कसा आहे हेच दाखवून देऊ.

भारतीय राज्यघटनेनेदेखील स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. असे असूनसुद्धा ‘बालस्वातंत्र्य’ हा विषय गुंतागुंतीचा का व्हावा? आपण पाहतो, प्रत्यक्षात पालक दाखले देतात की अभिमन्यू आईच्या पोटात असतानाच विद्या शिकला, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे वगैरे… पण प्रत्यक्षात पालकांच्या भूमिकेत गेल्यावर आपलं मुल लहान आहे त्याला काही कळत नाही असे म्हणून आपली मते त्यांच्यावर लादतात व स्वातंत्र्यावर गदा आणतात. आपण पालक म्हणून वा शिक्षक म्हणून मुलांचे विचार लक्षात घेतच नाही आहोत तर मुलांवर आपले विचार थोपविणे हेच दिसून येत आहे. मुलं स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्व आहे हेच अजून आपल्याला कळलेलं नाही. मुलांचे सर्व निर्णय आज पालक घेत असलेले दिसून येते. मुलाने आज कुठला ड्रेस घातला पाहिजे, आज काय खाल्लं पाहिजे, खेळायला गेलं पाहिजे की नाही, कुठला खेळ खेळला पाहिजे आदी म्हणजे आपण अजिबातच मुलांचे मत लक्षात घेत नाही आहोत. सर्वच बाबतीत आज पालक निर्णय घेत आहेत. पालकांना मुलांवर काही सोपवायच नाहीये कारण त्यांना भीती वाटते की मुलाला ते जमेलच अस नाही परंतु जोपर्यंत आपण मुलांवर विश्वास दाखवणार नाही अन त्याला गोष्टी करु देणार नाही तोपर्यंत त्याला समजेल तरी कसं! शिकण्यासाठी अगोदर करू दिलं गेलं पाहिजे. खरतर मुल अनुभवातून अनेक गोष्टी शिकत असतात, पण आपण जर त्याला अनुभवच घेऊ दिले नाहीत तर तो बंदिस्त होईल, तो स्वतः कधी निर्णय घेऊ शकणार नाही आणि मग सतत त्याला दुसऱ्याच्या निर्णयाकडे बघावं लागेल. यामुळेच मुलांची शिकण्याची प्रक्रिया थांबेल.

मुळात मुलांना शिकवून घ्यायला फारसे आवडत नसले तरी शिकायला आवडते. मात्र त्यात नवेपण आणि नवीन प्रश्नांचे आव्हान मिळावे लागते. मुले खरोखर रमतात ती सतत नव्याचा शोध घेण्यात. अभ्यासक्रम असा नवशोधांच्या रूपात मांडणी करून विद्यार्थ्यांपुढे ठेवावा लागतो. त्याचे रूपांतर कृतिशील उपक्रमात करता येते. असे झाले की मुले आपणहून आणि आनंदाने सारे काही समजून घेऊ लागतात. मुलांनी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत काय केलं पाहिजे हे आज पालक ठरवत आहेत. पालक आज मुलांना रेडिमेड बनवत चाललेले आहेत. मुलांना त्यांचं आयुष्य शर्यतीसारखं जगायला लावण्यामागे पालक, शिक्षक व शिक्षणपद्धती दोषी आहेत. “जिज्ञासा, कुतूहल, निरीक्षण, आणि संशोधन या वाटेने मुलांना जाऊ देणे हेच खरं तर बालस्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ आहे.” मुलांच्या भविष्याच्या नावाखाली त्यांचे स्वातंत्र्य हडप करून त्यांना रोगट बनविण्याचे काम आई-वडील करत असतानाचे दिसून येत आहे. आजची मुलं शाळांतून आणि घरांतून विलक्षण दडपणाखाली शिकताहेत. शाळांचे बंदिस्त वातावरण, तिथले पठडीबद्ध शिक्षण, शिक्षकांच्या शिक्षांचे भय, मुलांवर वाढत्या प्रमाणात ओझी लादणारे शासकीय शिक्षण धोरण आणि घरोघरी पालकांच्या अनाठायी आग्रही आशा-आकांक्षांचे दडपण याखाली मुले आपले बालपण हरवून बसताहेत. वेळापत्रकांच्या आणि अभ्यासाच्या ओझ्याने अकालीच प्रौढ होताहेत असे वाटते. त्यातच त्यांच्या उपजत क्षमता आणि विकासाच्या शक्यता मारल्या जात आहेत. एक शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या कमजोर नागरिक निर्माण होण्याच्या शक्यताच यातून दुणावत आहेत.

लहान वयातच मुलांनी स्वतंत्र विचार करायला शिकणे योग्य आहे. व्यक्तिस्वातंत्र्य लहान मुलांनाही त्यांच्या विकासाची नैसर्गिक गरज म्हणून भोगता आले पाहिजे. पालक म्हणून आपण लहानपणापासूनच मुलांचे विचार स्वातंत्र्य जोपासायला हवे. मुलांना घरामध्ये स्वतंत्रपणे वागू दिले पाहिजे, त्यांना घरातील एखादा निर्णय घेऊ दिला पाहिजे, त्यांनाही निर्णय घेताना येणारे अनुभव येतील आणि त्यातूनच त्याचा विकास होईल. बालकांना स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे कोणीही समजून घेत नाही. त्याचं महत्त्व कोणीही लक्षात घेत नाही. आजचा बालक हा भावी काळातील नागरिक बनणार असतो आणि त्याला स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्यायचे असतात. येणाऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड द्यायचं असतं. सृजनशील नागरिक बनण्यासाठी त्यांच्या अंगात असणाऱ्या सर्व क्षमतांचा विकास व्हायला हवा आणि हा विकास ‘छडी लागे छमछम’ या पद्धतीने किंवा ‘घोकंपट्टी’ करून आणि केवळ परीक्षार्थी बनून घडणार नाही. तात्पुरता त्याचा परिणाम चांगला दिसला तरी तो चिरकाल टिकणारा नसतो आणि म्हणूनच तो निरुपयोगी ठरतो असे वाटते.

पूर्वी मुलांचे दिनचर्यामध्ये सुरपारंब्या, लपंडाव, विटीदांडू व भातुकली यासारखे खेळ असायचे परंतु आज मुलांची दिनचर्या एका क्लासेसपासून सुरु होऊन पुन्हा दुसऱ्या क्लासेसपर्यंत होत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे असे दिसते. शाळेत मुलांचा विकास होतो असे आपण मानले तर घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हणल्याप्रमाणे “बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात…” ही जबाबदारी शाळांना घ्यावी लागेल. तसेच दर्जा, सुविधा व संधी यांच्याबाबत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी शासनाला जबाबदारी घ्यावी लागेल. शिक्षणाविषयीचा एक श्वाश्वत दृष्टिकोण माँटेसरी बाईंनी शतकापूवीर्च देऊन ठेवला आहे. पण तो आजपर्यंत दुर्लक्षित राहिला; कारण माँटेसरीचे काम आपण बालशिक्षणापुरतेच मर्यादित मानले. आज खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेच्या काळात मुलांना कुठल्याच प्रकारचे स्वातंत्र्य नसून त्यांना पालकांच्या म्हणण्याप्रमाणे पळावे लागत आहे, हा मार्ग अत्यंत चुकीचा आहे. मुलांच्या आवडी-निवडी याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत चाललेले दिसून येत आहे. प्रत्येक बाबतीत यशच मिळायला हवे, अपयश हा देखील जीवनाचा एक भाग असतो असे त्यांना शिकवले जात नाही. यामुळे मुलांना अपयश पचवणे फार कठीण झालेले आहे. अपयश सहन न झाल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुलांवर त्याचा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. मुलांना स्वतः निर्णय घेण्याची सूट प्रत्येक घरात असायला हवी. निर्णय स्वातंत्र्य मिळाले तर मुलांना जबाबदारीची जाणीव होते आणि हे मुलांच्या पुढील आयुष्यासाठी फार महत्त्वाचे आहे यातूनच मुलं हे उद्याचे सुजाण नागरिक होऊ शकतील.

स्नेहा चामले

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment