शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

औरंगाबाद – महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात काल दुपारी अचानक ट्रान्सफॉर्मर मध्ये मोठा बिघाड झाला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काल सायंकाळी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येणार होता तो झाला नाही. आजही अर्ध्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा होणार नाही. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

जलशुद्धीकरण केंद्रात 56 एमएलडी आणि 100 एमएलडी अशा दोन पाणीपुरवठा योजना आहेत. सिडको-हडकोसह जून्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 100 एमएलडी योजनेच्या ट्रांसफार्मर मध्ये काल दुपारी अचानक बिघाड झाला. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. सायंकाळी उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा चे वेळापत्रक एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले. शहराच्या ज्या भागात काल पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आज पाणी पुरवठा होईल.

ट्रांसफार्मर दुरुस्तीच्या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ढोरकिन येथील पाण्याची गळती बंद करण्याचे काम केले. याच ठिकाणचा एक एअर व्हॉल्व्हदेखील बदलण्यात आला. ही माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.