स्टेडियमला मोदींचं नाव, म्हणजे भारत आता एकही सामना हरणार नाही – उद्धव ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियमच नामांतरण नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर देशातील भाजप विरोधकांनी मोदींना लक्ष्य केले आहे. दरम्यान यावरूनच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला आहे. स्टेडियमला मोदींच नाव दिल आहे म्हणजे आता भारत एकही सामना हरणार नाही असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.

गुजरातमध्ये सरदार पटेलांचे नाव बदलून स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. म्हणजे आता भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, असे म्हणायला हरकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. आम्ही विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे आणि त्यांनी सरदार पटेलांचे नाव स्टेडियमवरून पुसून टाकले आहे, हा आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून देखील भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. वीर सावरकरांवर खूप प्रेम असल्याचं भाजपकडून वारंवार दाखवलं जातं मात्र, त्यांना भारतरत्न काही दिला जात नाही. भारतरत्न कोण देऊ शकतो, आमदारांची कमिटी तर हा पुरस्कार देऊ शकत नाही! हा अधिकार पंतप्रधान कार्यालयाला आहे. त्यांनी तो द्यायला हवा पण ते देत नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like