गृहमंत्र्यांवर नाराज नाही, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत होती तसेच राष्ट्रवादी कडे असलेले हे गृहखाते शिवसेनाला हवं आहे अशाही बातम्या समोर येत आहेत. मात्र आज या एकूण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे म्हंटल आहे.

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताचं स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत.अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे

दरम्यान, आज सकाळी शिववसेना खासदार संजय राऊत यांनी गृहखात्याच्या कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे