स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसला कानपिचक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सत्तेसाठी शिवसेना कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाची पालखीही वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म लोकांच्या न्याय हक्कांसाठी झाला आहे. विकृत राजकारण करीत राहिलो तर आपलं आणि देशाचं काही खरं नाही असेही ते म्हणाले.