हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान मराठा आरक्षण यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. दरम्यान ‘या’ भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.