..आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुर्चीवरुन उठून उभे राहून त्यांना हात जोडले; कोण होते ते लोक?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी काही लोक मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन द्यायला आले होते. त्यांना पाहून ठाकरे खुर्चीवरुन उठून उभे राहिले अन् त्यांना विनम्रतेने हात जोडले. मुख्यमंत्र्यांचा तो फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतील ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फोटोतील व्यक्ती ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर आहेत. मिरजकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले असता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यांनी विनम्रपणे हात जोडले, नमस्कार केला…… मुख्यमंत्र्यांमधील संवेदनशील आणि विनम्र व्यक्तीचा अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला.

खरं तर विश्वनाथ मिरजकर आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट. श्री. मिरजकर त्यांना निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना मिरजकर हे ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते असल्याची ओळख करून दिली. आपल्या समोर एक ज्येष्ठ शिक्षक उभा आहे, हे लक्षात येताच श्री. ठाकरे खुर्चीतून उठले आणि त्यांनी विनम्रपणे हात जोडले. प्रश्न समजून घेतले.

मुख्यमंत्र्यांनी थेट उभं राहून नमस्कार केल्यानंतर विश्‍वनाथ मिरजकर भारावून गेले. आम्ही अनेकदा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यांनी ती खुर्चीत बसूनच हाती घेतली. आम्ही उभे असायचो, फोटो काढायचो. परवा मात्र धक्का बसला. मुख्यमंत्री उठून उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी आमचे निवेदन घेतले. गुरुजणांप्रतीची ही विनम्रता मनाला स्पर्श करून गेली. असे त्यांनी म्हंटल.

राजकीय नेत्यांनी सामान्य माणसाला भरभरून पैसे, निधी, मदतच द्यायला हवी, असे प्रत्येकवेळी नसते. थोडाशा सन्मानानेही सामान्य माणूस भारावून जातो. हा सन्मान दीर्घकाळ स्मरणात राहतो. शिक्षकांचे प्रश्‍न कालही होते, आजही आहेत, उद्याही असतील… कुठल्याच घटकाचा प्रश्न कधीच शंभर टक्के संपत नसतो. तो हाताळताना जबाबदार घटक ज्याचा प्रश्‍न आहे, त्याच्याविषयी किती आत्मीयता दाखवतात, हा खरा मुद्दा असतो.

Leave a Comment