सातारा जिल्हा बॅंक निवडणूक रिंगणात पदाच्या लालसेपोटी नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे सहकार तथा पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून निवडणूक लढवत आहेत. देशात लौकिक असलेल्या या बँकेत सत्तेसाठी नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्व सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. पश्चिम महाराष्ट्राचे अर्थकारण सहकारी साखर कारखानदारीवर चालते. या कारखानदारीला दरवर्षी अर्थ साहाय्य जिल्हा मध्यवर्ती बँक करत असते. प्रत्यक्षपणे बँकेच्या उलाढालीत सहकारी साखर कारखान्यांचाही सहभाग असतो.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेने व स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना हाही या बँकेचा मोठा ग्राहक आहे. पण स्वर्गीय पी. डी. पाटील हे कराड शहर व कराड उत्तर या पलीकडे कधी गेले नाहीत.
1995 सालच्या कारखाना निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील हे या कारखान्याचे चेअरमन झाले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा शुभारंभ सहकारातून झाला. गेली गेली 25 वर्षे ते कारखान्याचे नेतृत्व करत आहेत. उसाला राज्यात विक्रमी दर, उच्चांकी गाळप करत सह्याद्रीने राज्यात आपले अग्रस्थान कायम ठेवले. स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या पश्चात कारखान्यासह उपसा जलसिंचन योजना, बँक, पतसंस्था अशा सहकारी संस्थांचे नेतृत्व बाळासाहेब पाटील हे करत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर या आघाडीचे शिल्पकार, खासदार शरद पवार यांनी बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पक्षातील दिग्गजांची नावे समोर असताना सहकार व पणन या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मंत्रिपदाचा भार शरद पवार यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे सोपवला. ही जबाबदारी त्यांना सहकारात केलेल्या कामाच्या मेरिटवर मिळाली आहे.

गेल्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना बॅंकेवर स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले. यावेळी ते कराड सोसायटी गटातून निवडणूक लढवत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत आजवर स्वर्गीय पी. डी. पाटील कुटुंबीयांना क्षमता व सहकारात काम करण्याचा अनुभव जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. ते का दिले गेले नाही, याची उत्तरे आजवर मिळाली नाहीत. पी. डी. पाटील यांच्या पश्चात त्यांचे सुपूत्र बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गत निवडणुकीनंतर आमदार बाळासाहेब पाटील यांना स्वीकृत म्हणून संधी देण्यात आली. आता या निवडणुकीत ते कराड सोसायटी गटातून लढत आहेत. आपणाला सत्तेची किंवा बँकेच्या पदाची लालसा नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment