औरंगाबाद | शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवरील आकाशवाणी चौकात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारण्यात यावा. तसेच सिडको बसस्थानकं ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करावे, यासाठी आमदार अतुल सावे यांच्यातर्फे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळाने मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गड़करी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. आमदार अतुल सावे म्हणाले, की जालना रोडवरील आकाशवाणी चौक व अमरप्रीत चौक या ठिकाणी नेहमी वाहनांची वर्दळ असते. याच ठिकाणी शाळा-महाविद्यालये, रुग्णालये असल्यामुळे सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो.
त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अमरप्रीत चौक व आकाशवाणी येथे अद्यावत उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्यात यावा. यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. सिडको बस स्टैंड ते हर्सल टी पॉइंट या पाच किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार नारायण कुचे, अनिल मकरिये यांची उपस्थिती होती.