अलाहाबाद – काँग्रेसचा ऱ्हास, वंचित घटकांकडे दुर्लक्ष आणि बरंच काही..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अलाहाबाद हे उत्तरप्रदेशातील एक महत्त्वाचं ठिकाण. विधानसभेच्या १२ जागा या जिल्ह्यात आहेत. उत्तरप्रदेश निवडणूक निकाल ४-५ दिवसांत हाती लागतील. इथल्या पूर्ण राजकीय परिस्थितीचा अंदाज लावता येणं अशक्य असलं तरी पूर्वांचलमधील या जिल्ह्याचं सामाजिक-राजकीय आकलन वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या लेखातून करत आहे.

अलाहाबाद, इलाहाबाद किंवा प्रयागराज अशा तीन नावांनी हे शहर ओळखलं जातंय. पूर्वांचल दौऱ्याची सुरुवात या शहरातून करण्याचं खास कारण होतं इथलं राजकीय महत्त्व. विधानसभेच्या १२ जागा या क्षेत्रात येतात. इथल्या सामान्य नागरिकांशी, विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी, दुकानदारांशी, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी भेटून, बोलून इथली स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

अलाहाबाद आणि काँग्रेस – स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात (१९९० पर्यंत) काँग्रेसचं आणि पर्यायाने नेहरू-गांधी कुटुंबाचं मध्यवर्ती केंद्र असलेलं हे शहर. मोतीलाल नेहरू यांचं निवासस्थान असलेलं आनंद भवन ही अलाहाबाद शहराची खास ओळख. मोतीलाल नेहरू यांच्यानंतर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचं वास्तव्य आनंद भवनात होतं. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठका या ठिकाणी होत. याशिवाय जवाहरलाल नेहरू यांची हजारो पुस्तकांची लायब्ररी याच ठिकाणी आहे. नेहरू कुटुंबाची ओळख करुन देणारं चित्रदालन ही आनंद भवनची खास ओळख. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर गांधी कुटुंबीयांचं या ठिकाणी येणं-जाणं तुलनेनं कमी झालं.

आनंद भवन व्यतिरिक्त अलाहाबाद शहरात काँग्रेसचं ठळकपणे अस्तित्व जाणवून येतं ते अनुग्रह नारायण सिंग या माजी आमदारांमुळे. आधी जनता पक्ष आणि नंतर काँग्रेसमधून आमदार झालेल्या अनुग्रह नारायण सिंग यांची मतदारसंघात बऱ्यापैकी पकड आहे. २०१७ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला असला तरी मतदारांमध्ये त्यांचं नाव आजही चर्चेत आहे. १९८९ नंतर अलाहाबादमध्ये काँग्रेस कधीच वरचढ ठरू शकली नाही याचं महत्त्वाचं कारण काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करणं आणि प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा मतदार हिरावून घेणं हे उदाहरणदाखल सांगता येतं. हेमवतीनंदन बहुगुणा हे काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री झालेले महत्त्वाचे नेते. त्यांच्या कुटुंबातील राजकीय धुरा सांभाळणाऱ्या सद्यस्थितीतील नेत्या रिटा बहुगुणा-जोशी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. या कारणामुळे काँग्रेसचं वर्चस्व असलेला बहुतांश मतदार भाजपकडे वळाला. शिवाय १९९० नंतर ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षात झाल्याने काँग्रेसने या भागातील आपला जनाधार गमावला.

अलाहाबादमध्ये काँग्रेसने ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हे आपलं अभियान जोमाने राबवलं आहे. इथल्या १२ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात महिला उमेदवारांना तिकीट देऊन काँग्रेसने आपली प्रचारमोहीम प्रभावीपणे राबवली. यातील ‘बारा’ विधानसभा मतदारसंघातून मंजू संत या काँग्रेस उमेदवार मागील २० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. महिला सबलीकरणाच्या निमित्ताने मंजू संत यांनी मतदारसंघात वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. एक सामान्य महिला ते जिल्हा परिषद सदस्या आणि तिथून राष्ट्रीय पक्षाकडून आमदारकीची उमेदवार हा प्रवास सोपा नसल्याचं मंजू संत सांगतात. काँग्रेसचं वर्चस्व कमी झाल्याच्या कालखंडात महिलांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याच्या हेतूने प्रियांका गांधी करत असलेल्या प्रयत्नांचं संत यांनी कौतुक केलं. प्रियांका यांच्या प्रयत्नांमुळे महिला बोलू लागल्या असून स्वतःच्या अधिकारांबाबत जागरूक झाल्याचंही संत पुढे म्हणाल्या.

वंचित घटकांकडे दुर्लक्ष – अलाहाबाद शहरात आणि ग्रामीण भागात आढळून येणारे लोक यांच्यात सोयीसुविधांचा मूलभूत फरक जाणवत होता. फाफामाऊ, घागरा आणि सिमरा या गावांतील काही घटनांवरून तो ठळकपणे अधोरेखित होतो.

फाफामाऊ – अलाहाबाद शहरातून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव. या ठिकाणी रेल्वेस्थानकही आहे. रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या एका २० कुटुंबाच्या वस्तीला भेट दिली असता या लोकांचं हलखीतील जगणं समोर आलं. मागील ४० वर्षांपासून हे लोक या भागात राहतात. रेल्वेच्या रूंदीकरणासाठी जसजशी जागा वापरली गेली तसतशी या लोकांची वस्ती हलवण्यात आली. या लोकांना अद्यापही पक्की घरं बांधून मिळालेली नाहीत. यातील अनेकांजवेळ रेशनकार्ड नसल्याचं स्थानिक रहिवासी रामचरण सांगत होते.

याव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची सोय नसल्याने वस्तीतील लोकं रेल्वे स्टेशनच्याच नळाचा आणि शौचालयाचा वापर करत असल्याचं समजलं. या भागातील मुलं शाळा शिकत नाहीत. बिगारी काम (बांधकाम मजूर) करणं, डुक्कर पकडणं, लग्नातल्या वरातीत दिवे नाचवनं ही कामं इथली मंडळी अनेक वर्षं करतायत. कोणतीही सामाजिक सुरक्षा नसलेल्या इथल्या लोकांना सरकारी योजनांचा लाभही नीटपणे मिळत नाही. कोविडनंतरच्या काळात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही.

तसेच ई श्रमिक कार्डचा निधी बँक खात्यात जमा होत नाही अशी तक्रारही इथल्या स्थानिक रहिवाश्यांनी केली. हरेराम मुरत हे स्थानिक गावकरी योगी सरकारच्या कारभाराबाबत नाराज दिसले. सरकारी नोकरभरतीत सुरू असलेला गलथानपणा, समाजवादी पक्षाच्या अनेक योजना भारत सरकारकडून पुढे रेटल्या जाणं आणि त्याचं श्रेय घेतलं जाणं यावर त्यांनी टिप्पणी केली. देवा-धर्माच्या नावावर आमच्यात किती वर्षं फूट पाडणार असा उद्वेगजनक सवालही त्यांनी यावेळी विचारला. या भागाची परिस्थिती कोणतीही सत्ता असली किंवा निवडणूक जवळ आली तरी विशेष सुधारलेली नाही असंच चित्र याठिकाणी दिसून येत होतं.

घागरा आणि सिमरा – अलाहाबाद शहरापासून साधारण २५ किलोमीटर साहसों गाव आहे. या गावापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या घागरा आणि सिमरा गावात तथाकथित उच्चवर्णीय लोकांनी गावातील दलित समाजातील लोकांना २ वेगवेगळ्या गुन्ह्यांत मारून टाकल्याच्या धक्कादायक घटना कानावर पडल्या. २०२१ च्या जुलै महिन्यात घागरा गावात श्रद्धा पासवान या ७ वर्षीय चिमुरडीवर गावातील ठाकूर समाजातील ४५ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केला. पाशवी मानसिकता असलेल्या या इसमाने या खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, शिवाय मुलीच्या घरच्यांना त्रास देऊन त्या समाजातील इतर लोकांना धमकावलं. मात्र तिथल्या लोकांनी एकजूट दाखवत पोलिसांवर दबाव आणून या प्रकरणाचा छडा लावला. महिलांच्या सुरक्षिततेचा डंका पिटणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये अशा अनेक घटना मागील ५ वर्षांत घडल्या असून त्याचा योग्य तपास होत नसल्याची तक्रारही पीडित कुटुंबीयांनी केली.

सिमरा या गावात किरकोळ भांडणातून एका ज्येष्ठ नागरिकाचा खून ठाकूर समाजातील लोकांनी केल्याची धक्कादायक घटना सप्टेंबर २०२१ मध्ये घडली. गावात जातीय अत्याचाराच्या घटनांचं काही वातावरण नसल्याचं पीडित कुटुंबातील लोकांनी सांगितलं. मात्र असा गुन्हा घडल्यानंतर पोलीससुद्धा उच्च जातीतील लोकांना पाठिंबा देत असल्याची सल त्यांनी बोलून दाखवली.

या तीन घटनांव्यतिरिक्त गोहरी या नजीकच्या गावात एकाच कुटुंबातील ४ जणांचा निर्घृण खून केल्याची घटनाही ताजीच आहे. दलित, बहुजन समाजातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकूर समाजातील लोक करत असून त्यांना पाठिशी घालण्याचं काम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि पीडित कुटुंबाकडून केली जात आहे.

आझाद समाज पार्टी – चंद्रशेखर आझाद ‘रावण’ यांनी संघटन केलेली भीम आर्मी यंदाच्या निवडणुक मैदानात आझाद समाज पार्टी या नावाने शड्डू ठोकून उतरली. भाजपला विरोध हे तत्त्व डोक्यात ठेवलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी सुरुवातीला समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बोलणं फिस्कटल्यानंतर त्यांनी स्थानिक ३५ घटक पक्षांसह स्वतःची वेगळी आघाडी उभी केली. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढण्याचं काम आझाद समाज पक्षाकडून केलं जात आहे. मागील ५ वर्षांत उत्तर प्रदेशातील दलित समूह आणि स्त्रियांवर झालेले अत्याचार, सीएए-एनआरसी आंदोलन, कोविड काळातील अडचणी सोडवण्यासाठी भीम आर्मीने सक्रिय प्रयत्न केले. या प्रसंगी पक्ष प्रमुखांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र तरीही कायदेशीर मार्गाने लढा देण्याचं काम या पक्षातर्फे सुरू आहे. माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला पर्यायी राजकारण देण्याचा प्रयत्न आझाद आणि पक्षाकडून केला जात आहे. या संघटनात महिलांची संख्या लक्षणीय असून स्थानिक पातळीवर महिलांच्या, जातीय अत्याचाराच्या घडलेल्या घटनांचा पाठपुरावा करण्याचं काम भीम आर्मीचे कार्यकर्ते हिरीरीने करत आहेत. आमची ताकद कमी असली तरी आम्ही लढू, आमची बाजू मांडत राहू असं भीम आर्मीच्या वंदना सोनकर म्हणाल्या.

अलाहाबाद विश्वविद्यालय – विद्यार्थी संघटना – कोणत्याही राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटना ऍक्टिव्ह असतात. अलाहाबाद विश्वविद्यालयही त्याला अपवाद नाही. या विद्यापिठात समाजवादी पार्टी, अखिल भारतीय युवक काँग्रेस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटना काम करतात. कोरोना काळात विद्यापीठ बंद असल्याने इथले विद्यार्थी हवालदिल आहेत. अभ्यासिका, ग्रंथालयं सुरू नसल्याने इथल्या विद्यार्थी संघटनांनी जवळपास ५०० दिवसांहून अधिक काळ ‘चालतं-फिरतं’ उपोषण केलं आहे. निवडणुकांच्या काळात इथले विद्यार्थी आपापल्या पक्षाच्या कामात अधिक सक्रिय होतात. विद्यापीठातील शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत होणाऱ्या गोंधळाविषयी हे तरुण पोटतिडकीने बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या कामावर समाधानी नसलेले समाजवादी पक्ष आणि युवक काँग्रेसचे विद्यार्थी पुन्हा आपसांतच भांडायला लागले. या भांडणातही वेगळेपण इथल्या विद्यार्थी संघटनातील मुलं राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचं प्राथमिक निरीक्षणातून समजलं.

प्रयाग संगम – हे देशातील महत्त्वाचं तिर्थक्षेत्र आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेलं हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असून याठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या जत्रा भरलेल्या पाहायला मिळतात. जानेवारी महिन्यात या ठिकाणी माघ जत्रा भरते. महिनाभर चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. नजर जाईल इतक्या दूरपर्यंत भाविकांचे निवासी तंबू याठिकाणी पहायला मिळतात. प्रयाग संगमावरील तंबूंची जागा ही स्थानिक पंडितांनी परंपरागत पद्धतीने स्वतःच्या ताब्यात घेतली असून ही जागा ते पर्यटक भाविकांसाठी भाडेतत्त्वावर देतात.

या ठिकाणी आलेल्या लोकांच्या गजबजाटामुळे, धार्मिक विधींमुळे, आणि शौचालयांच्या खराब स्थितींमुळे गंगा नदीचं पात्र दूषित झाल्याचं पहायला मिळतं. संगमाच्या ठिकाणी गंगा नदी पिवळसर तर यमुना नदी हिरवट रंगांची झाल्याचंही लगेच लक्षात येतं. याच ठिकाणी ‘अलाहाबाद किल्ला’ आणि ‘झोपलेल्या हनुमानाची मूर्ती’ही आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं या ठिकाणी महिन्यातून येणं-जाणं असल्याचं मंदिर प्रशासनातील लोकांकडून समजलं. “सत्ता कुणाचीही असली तरी दर्शन घेण्यासाठी सगळीच मंडळी याठिकाणी येतात, इथं धार्मिक भेदभावाला थारा नसल्याचं सांगत येईल त्या लोकांना २ वेळचं पोटभर जेवण मोफत देण्याची सोयही केली जात असल्याचं एका साधूंनी सांगितलं.

सामान्य नागरिक काय विचार करतायत? – अलाहाबादमधील सामान्य नागरिकांशी राजकीय गप्पा मारल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह समजले. ‘माफियाराज’ हा शब्द त्याठिकाणी बराच रुढ झालेला आहे. या ठिकाणी १० पैकी किमान ४ लोकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती स्थानिक दुकानदार पंकज गुप्ता यांनी दिली. पंकज हे स्वतः वकील असून मोकळ्या वेळेत कपडे विक्रीचं काम करतात. ते म्हणतात, “योगी जी ने माफिया लोगों को सबक सिखाने की पुरी कोशीश की, लेकीन वो इसमे सफल नहीं हुये। अखिलेश के बारे मैं लोग नाराज नहीं हैं, फिर भी जाती के आधार पें वोट डालने की बात होती हैं, तो लोग अखिलेश का काम भूल जाते हैं। योगी जी के समय मैं कुछ खास विकास नहीं हुआ हैं – सिर्फ बिजली और रास्तों का काम ठीक सें हुआ हैं।

गुप्ता यांच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या मुकेश यादव या युवकाचं मतही काहीसं असंच. “योगी सरकारने बच्चों के भविष्य के साथ खिलवाड किया हैं। एग्जाम समय पें नहीं हो रहे हैं, पैसे देकर लोगों को नोकरी दी जा रही हैं। रोजगार के कुछ अवसर भी दिखाई नहीं दे रहे।” या शब्दांत मुकेशने आपली नाराजी व्यक्त केली.

काही सामान्य नागरिक मात्र योगी आणि मोदींच्या आकंठ प्रेमात बुडाल्याचंही पहायला मिळालं. ज्यूसविक्री करणारे प्रकाश दादा आपल्या आयुष्याची करूण कहाणी सांगत भावनिक झाले होते. ते म्हणाले, “मैंने इंदिरा जी का काम देखा था, ऊस वक्त के बाद देश मैं कोई देश के लिये काम करनेवाला नेता हैं तो वो सिर्फ मोदी जी ही हैं। मैं जबतक जिंदा हूं तबतक मोदी जी को ही वोट करुंगा। हे सगळं सांगताना स्वतःची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याचं दुःखही प्रकाश भाऊ लपवू शकले नाहीत.

अलाहाबादमध्ये योगी विरोधाची लाट अधिक तीव्र जाणवली नाही. तरीदेखील मागील निवडणुकांच्या तुलनेत भाजप इथल्या ३-४ जागा गमावेल असा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Comment