..तर १० ऑगस्टपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचेल- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा फैलाव वेगात होत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखावर पोहोचली आहे. कोरोना संक्रमणाचा वेग पुढील काही दिवस असाच कायम राहिल्यास १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांपर्यंत जाईल असा गंभीर इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखावर पोहोचल्याने चिंता व्यक्त करत सरकारला याबाबत योग्य पाऊल उचलायची विनंती केली आहे.

“सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. जर याचं वेगानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर देशात १० ऑगस्टपर्यंत २० लाखांपेक्षा अधिक करोनाबाधित होती. सरकारला ही महामारी रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे,” असं मत राहुल गांधी यांनी ट्विटरवर यावेळी व्यक्त केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात ३ लाख ४२ हजार रुग्ण हे सक्रिय आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनाची लागण होऊन २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”