हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे आज निधन झाले. वयाच्या अवघ्या ५४ व्य वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. माणिकराव जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले
विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/tzc3VskS76
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 26, 2021
माणिकराव जगताप यांच्या निधनावर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला . काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे.