काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची काहीच गरज नाही ; यशोमती ठाकूर यांनी राऊतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणासाठी प्रयत्न सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यासाठी प्रचंड प्रमाणात विरोध दर्शविला आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडली असून सकाळी संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे कान टोचले होते.

औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या काही टोले लगावले.

यावर आता कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ मध्ये असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहोत.काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची काहीच गरज नाही.आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यानंतर पुढे बोलता येईल.’ अस यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, औरंगाबादच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली असून आता राष्ट्रवादी नक्की काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like