नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारला संतप्त सवाल; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागालँडमधील मोन जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.  आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला संतप्त सवाल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, ‘हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. भारत सरकारने खरे उत्तर दिले पाहिजे. आपल्याच भूमीत नागरिक किंवा सुरक्षा कर्मचारी सुरक्षित नसताना गृह मंत्रालय नेमके काय करत आहे?’ असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे.

नागालँडच्या मोन जिल्ह्यातल्या तिरु या गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटिंग गावातून काही लोक एका पिकअप व्हॅनमधून घरी परतण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. सकाळपर्यंत ते पोहोचले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तेव्हा तिरू गावानजीक पिकअप व्हॅनमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेत काही जखमी देखील असल्याचं सांगितलं जात असून मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

You might also like