केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही : राहुल गांधींचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : करोना संक्रमित रुग्णांचे दररोज नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणारे आकडे आणि करोनामुळे होणारे मृत्यू, केंद्र सरकारची लसीकरण रणनीती यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकारकडून हल्ला करण्यात आलाय. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारला निशाण्यावर घेतलंय.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

‘थक्क करणारी गोष्ट म्हणजे, भारतात करोना संक्रमणाचा प्रभाव वाढत असताना, गेल्या ७० वर्षांतील सरकारची मेहनत पाण्यात घालत एकेकाळचा लस ‘निर्यातक’ देश आता लसीची आयात करणारा देश बनलाय. नरेंद्र मोदी हे असे पाटलट आहेत ज्यांनी आपात्कालीन परिस्थितीतून सहजगत्या बाहेर पडण्यासाठी केवळ बोर्डिंग पासवर आपला फोटो लावलाय’ असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलंय.

दुसरीकडे राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. ‘स्मशान आणि कब्रस्तान दोन्ही… जे म्हटलं ते करुन दाखवलं’ असं म्हणत ‘मोदी मेड डिजास्टर’ (मोदी रचित आपत्ती) असा हॅशटॅगही राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये जोडलाय. उल्लेखनीय म्हणजे, देशात करोना संक्रमित रुग्णाच्या आकड्यांनी दररोजचा जवळपास दोन लाखांचा टप्पा गाठलाय. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची, औषधांची, आरोग्य कर्मचाऱ्यांची वाणवा भासतेय. करोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्युंमुळे स्मशानभूमी आणि कब्रस्तानातही जागा कमी पडल्याचं चित्रं अनेक ठिकाणी दिसत आहे.

Leave a Comment