व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडमध्ये काँग्रेसचा 21 जुलैला मुकमोर्चा : मनोहर शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने सूडबुद्धीने कारवाई करीत ईडीची चौकशी जी सुरु केली आहे. त्या विरोधात कराड तालुका काँग्रेस च्या वतीने कराड शहरामध्ये 21 जुलै रोजी मूकमोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि. प. सदस्या विद्याताई थोरवडे, जि. प. सदस्य शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, पै. नानासो पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, राजेंद्र यादव, शहाजी पाटील, मोहन शिंगाडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले कि, केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील जनतेचा विचार न करता मनमानी कारभार ते करीत आहेत. काँग्रेस पक्षाने देशात लोकशाही रुजवली व त्याचपद्धतीने सत्ता काळात कारभार केला. विरोधी पक्षांना सन्मानाची वागणूक देणारा काँग्रेस पक्ष होता. कधीही सत्ता काळात काँग्रेस पक्षाने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. पण सद्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी ईडीच्या चौकशीचा ससेमीरा मागे लावून त्या नेत्याची व त्याच्या कुटुंबाची मानसिकता खराब करण्याचे कारस्थान भाजप सरकार कडून केले जात आहे. हेतूपुरस्सर काँग्रेसच्या प्रमुखांना ईडीच्या चौकशीमध्ये अडकविण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही काँग्रेस विचारांचे पाईक असे होऊ देणार नाही, म्हणूनच 21 जुलै रोजी कराड शहरातील महात्मा गांधीजीच्या पुतळ्यापासून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदार कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढला जाईल. या ठिकाणी मोर्चाची सांगता होऊन तहसीलदारना निवेदन दिले जाईल. या आंदोलनासाठी कराड तालुक्यातील काँग्रेस विचारांच्या सर्व पाईकांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी मनोहर शिंदे यांनी केले.

इंद्रजित चव्हाण म्हणाले, सोनिया गांधीं, राहुल गांधी यांची चौकशी करण्याबाबत कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु हे सर्व विरोधी पक्षांना केंद्रित करून हेतूपुरस्सर त्रास देण्याचा कुटील डाव भाजप करीत आहे. सत्तेचा गैरवापर करून जनतेवर अविचारी निर्णय लादले जात आहेतच ज्यामध्ये इंधनाची भाववाढ असो, नोटबंदी-जिएसटी च्या अंमलबजावणी चा निर्णय असो किंवा शेतकरी विरोधी कायदे असोत हा सर्व मनमानी कारभार जनतेसमोर आणणारे विरोधक यांना चौकशीमध्ये अडकविले जात आहे आणि त्यामध्ये जे शरण येतील त्यांना भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला जात आहे, अशी भाजपमध्ये गेलेल्या किती नेत्यांची पुन्हा चौकशी झाली आहे हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. काँग्रेस हा एकमेव देशभर प्रत्येक गावात व देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचलेला पक्ष आहे. त्यामुळेच त्यांच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठीच व प्रतिमा मलीन करण्यासाठीच ईडी चौकशी हि भाजप ची राजकीय खेळी आहे, म्हणून या विरोधात काँग्रेस कडून शांततापूर्ण वातावरणात मूकमोर्चा काढला जाणार आहे.