अमर, अकबर,अँथनी’ने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला’ ; काँग्रेसचा भाजपला उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. “अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा आज पराभव केला”, असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. तसेच एकोप्याचं फळ महाविकास आघाडीला मिळालं आहे असेही ते म्हणाले.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात की, “भारतीय जनता पक्ष नेहमी महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनींचं सरकार असं म्हणत होतं. परंतु अमर, अकबर, अँथनी जरा हिट चित्रपट होता. त्याचपद्धतीने महाविकास आघाडीचं कॉम्बिनेशन आता हिट झालं आहे आणि अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केलाय एवढं मात्र निश्चित आहे”

“देशहितासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या कारणासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले होते. आज त्या एकोप्याचं फळ आघाडीला मिळालं आहे. भाजपच्या १०५ जागांच्या १५० जागा होतील अशा वल्गना फडणवीस करत होते. तो भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. गेली ५५ वर्ष नागपुरात भाजपचा गड होता. तो गड त्यांना राखता आला नाही”, असंही सचिन सावंत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like