“कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र ”; संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘करोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय,’ असा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारवर आरोप केला. कोरोनासोबत लढण्यात केंद्राला अपयश आल्याचंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तीच राज्यं कोरोना लढाईत अपयशी ठरली असल्याचं सांगत महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला औषधं न देणं हा अमानुषपणा असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, “जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं करोनाशी लढण्यात अपयशी ठरले असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. ही संपूर्ण लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे,”

“कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकारं करत आहेत. जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला…कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, “केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला हवं. असे आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये अशा पद्धतीने करोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे. हे राज्य मोठं आहे. पुणे, नागपूर, मुंबई ही मोठी शहरं आहेत. संपूर्ण देशांचा या शहरांवर भार आहे. याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे. लस, रेमडिसीवर या गोष्टी भाजपाच्या गुजरातमधील कार्यालयात हवी तेवढी मिळत आहेत. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती औषधं घेऊ शकता…पण महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला ती न देणं हा अमानुषपणा आहे”.

“हे राष्ट्र एक आहे आणि ते एक ठेवण्याचा प्रयत्न मला दिसत नाही. प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण केलं जात असून याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सर्वात प्रथम विरोधी केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राचा सुद्दा अपमान आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दातं संजय राऊत यांनी सुनावलं आहे.

 

You might also like