मेढ्यात व्हेंटिलेटरअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू, मृतदेह ३ तास रिक्षातच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाने आपला हाहाकार माजवला आहे. दरदिवशी ७५० हुन अधिक बाधित रुग्ण सापडत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. मेढा गावात मागील ४ दिवसांत तब्बल १५४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून रुग्णालयात व्हेंटिलेटर्स कमी पडत असल्याने काही रुग्णांना आपला जीवही गमवावा लागत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

शनिवारी दुपारी एका कोरोनाबाधित रुग्णाचं पार्थिव रुग्णालयाच्या दारावर रिक्षामध्ये तसंच पडून राहिल्याने एकच हाहाकार माजला होता. तब्बल तीन तास या पार्थिवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. या काळात दवाखान्याजवळ येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तो पेशंट कोरोनाबाधित असल्याचं समजताच एकच धास्ती घेतल्याचं स्पष्ट दिसून येत होतं.

सदर रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला काही काळ विलगीकरणातही ठेवण्यात आलं होतं. या रुग्णाला अधिक त्रास सुरू झाल्यानंतर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकताही भासू लागली. हे समजताच मेढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ त्याला त्याचे सहकारी घेऊन आले. तिथे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन न मिळाल्याने त्याने मेढा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पोर्चमध्ये आपला जीव सोडला. डोळ्यांसमोर हा सर्व भयानक प्रकार होत असताना त्याच्या मदतीला ग्रामीण रुग्णालयातील कोणीही वैद्यकीय कर्मचारी वा अधिकारी धावले नाहीत. रूग्णालयामधील रुग्णवाहिकाही सदर व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी हालचाल करु शकली नाही.

या धक्कादायक घटनेनंतर आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील बाधित रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र समोर दिसून आलं आहे. मेढ्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. जावळी तालुक्यातील पुनवडी गावाचा कोरोनाचा थरार अजूनदेखील कमी येत नसताना मेढा येथेही कोरोना  रुग्णांचं द्विशतक होण्याची वेळ आली आहे. एवढं सगळं होऊनही जिल्हा प्रशासन मात्र अद्याप ग्रामीण भागात लक्ष देण्यास तयार नाही.

दुर्गम आणि डोंगराळ भागातील आरोग्य सुविधांबाबत आरोग्य विभागाने कायमस्वरूपी दुर्लक्ष केलं असून जावळी तालुक्यामध्ये याचाच परिणाम कोरोनाच्या हाहाकारात दिसून येत आहे. सदर भागातील लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने तात्काळ अद्यावत यंत्रणा उभारावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment