औरंगाबाद ।औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेत मृत्यू झालेलया रुग्णाचे नाव गुलाबराव ढवळे असे असून, हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजन विना शौचालयांमध्ये पडून होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
रुग्ण रात्रीच्या सुमारास शौचालयात गेलेला होता. सदरील रुग्ण चक्कर येऊन शौचालयात पडला, त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही. तब्बल साडेचार तास रुग्ण परत न आल्यामुळे तेथे असलेल्या इतर रुग्णांनी तक्रार केली. तेव्हा स्वच्छालयात जाऊन पाहणी केली असता स्वच्छालयाचे दार बंद होते. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिलं असता, रुग्ण हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे समोर आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यानंतर रुग्णाला तपासला असता त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले. शौचालयात जाऊन मृत्यू झाल्यानंतर तब्बल साडेचार तास जिल्हा रुग्णालयाने या रुग्णाकडे लक्ष न दिल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयावर कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.