शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी; ६३ जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद | शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बाहेरगावाहून येणा-यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करणा-या हजारो नागरिकांची शहराच्या एन्ट्री पॉइंटवरच तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून प्रवाशांची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात असून मगच शहरात प्रवेश दिला जात आहे. शुक्रवारी शहराच्या ६ एन्ट्री पॉइंटवर बाहेरगावाहून येणाऱ्या ६३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सध्या शहराच्या ६ एन्ट्री पॉइंटवर बाहेर गावाहून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शुक्रवारी बाहेरगावाहून येणाऱ्या ६३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. चिकलठाणा येथील एन्ट्री पॉइंटवर २०४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आले. हर्सुल टी पॉइंटवर १२६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २० जण पॉझिटिव्ह आढळले.

कांचनवाडी येथे १३७ जणांची कोरोना चाचणीपैकी ११ जण पॉझिटिव्ह आले. झाल्टा फाटा येथे १४०  चाचणीपैकी सात जण, नगरनाका येथे ५३७ चाचणीपैकी पाच जण, दौलताबाद टी पॉइंट येथे २६५ चाचणीपैकी पाच जण पॉझिटिव्ह आढळले. रेल्वेस्टेशन व विमानतळावर काल गुरुवारी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत चार प्रवासी पॉझिटिव्ह आढळले.  चारही प्रवासी विमानतळावरील होते. शुक्रवार, २ एप्रिल रोजी रेल्वेस्टेशन येथे ९७ प्रवाशांची तर विमानतळावर २५ प्रवाशांची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात आली.

You might also like