“कोरोना लसीमध्ये गाईच्या रक्ताचा वापर”; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संपूर्ण जगासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांचा आकडा तब्बल 1,02,24,303 वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. कोरोनावर लस तयार करण्यात येत असून काही ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. मात्र, आता कोरोनाची लस येण्याआधीच यावरुन नवा वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीबाबत केलेल्या दाव्याला वैज्ञानिक किंवा अन्य कुठलाही पुरावा दिला नाही आहे.

मात्र, तरीही गायीचं रक्त असणारी ही कथित कोरोना लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणि यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे. स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे.

स्वामी चक्रपाणि यांनी “कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र, यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही असं तर्कट दिलंय. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकामध्ये जी लस तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं आहे” असा दावा केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर स्वामी चक्रपाणि यांनी संसर्गापासून बचावासाठी गोमूत्र प्राशन करण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय सामूहिक गोमूत्र प्रशनाचा कार्यक्रम हाती घेतला होता.

तर आमचा धर्म भ्रष्ट होईल..
“सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानण्यात येतं. जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच कोरोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती आम्हाला दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरणाचं काम हाती घेण्यात यावं” असं देखील स्वामी चक्रपाणि यांनी म्हटलं आहे. चक्रपाणि यांनी प्रामुख्याने अमेरिकेतील लसीसंदर्भात भाष्य केलं आहे. गायीचं रक्त वापरण्यात आलेली लस ही अमेरिकेतील लस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment