कोरोनाचा कार विक्रीला फटका; एप्रिल महिन्यात एकही नवी कार विकली गेली नाही..

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आर्थिक संकट गडद झाले आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्व व्यवहार ठप्प असून सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे ऑटो क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. याचा अंदाज केवळ या गोष्टीवरून लावता येऊ शकतो कि, गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर एकाही गाडीची विक्री झाली नाही आहे. इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने ही माहिती दिली आहे. इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे की, संपूर्ण महिन्यात एकही कार विकली गेली नाही. देशात सर्वात जास्त विकली जाणारी कार मारुती सुझूकीपासून ते लग्झरी कार मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, स्कोडापर्यंत एकाही कंपनीची कार विकली गेली नाही.

संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं हा लॉकडाऊन आणखी किती दिवस लांबणार याबाबत अजूनही चित्र स्पष्ट होताना दिसत नाही आहे. अशावेळी पुढील महिन्यात सुद्धा देशात कारची विक्री होईल की नाही माहिती नाही असा अंदाज ऑटो इंडिस्ट्रीजमधील संबंधित अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. भारतातील आणि अन्य आघाडीच्या ऑटो क्षेत्राला कोरोनाचा फटका बसला असून यातून सावरणे ऑटो क्षेत्राला अवघड जाणार आहे. मे महिन्यात सुद्धा परिस्थितीत फार फरक पडलेला दिसणार नाही. अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असे मारुती सुझुकीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी म्हटले आहे.

स्कोडा कार कंपनीचे हेड जॅक हॉलिस यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, एप्रिल महिन्यात स्कोडा कंपनीची एक कार विकली गेली नाही. गेल्या ३० वर्षात हे पहिल्यांदा चित्र पाहत आहे. मला आशा आहे की, ऑटो क्षेत्र लवकरच पहिल्यासारखे सुरळीत सुरू होईल. कोरोना व्हायरसने देशभरात पाय पसरल्यानंतर मार्च महिन्यापासून ऑटो क्षेत्राला याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात जास्त कार विकणाऱ्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाई यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत मार्च महिन्यात ४६ टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आता हीच घसरण या महिन्यात एकही कार विक्री न झाल्यानं १०० टक्के पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like