भारतातील पहिल्या कोरोना लशीसंबंधी पंतप्रधानांची खुशखबर, किंमत आणि लसीकरण प्लॅनही सांगितला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वॅक्सिन (Corona Vaccine) दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन वॅक्सिनची किंमत निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना लस या विषयावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सहभागी झाले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. मी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लस उत्पादनाच्या संदर्भात देशात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. वेगवेगळ्या टप्प्यावर 8 लसींची चाचणी सुरु आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

लसीसाठी खास सॉफ्टवेअर
कोरोनाच्या लसीकरणासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. लसीचा साठा आणि त्याची मागणी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचालित केली जाणार आहे. या लसीकरण अभियानाबद्दल देशात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी मिळून अफवेपासून दूर राहावं, आणि जनतेलाही जागरुक करावं अशी मागणी त्यांनी केली. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी किंवा कोरोना लसीबाबत कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडे एखादी सूचना असेल तर त्यांनी सरकारकडे लेखी पाठवावी, त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी हमी पंतप्रधानांनी दिली.

जनतेला डोळ्यासमोर ठेवून लसीची किमत ठरवली जाईल. भारताने इतर देशांच्या तुलनेत कोरोनाला चांगला लढा दिला. लस दृष्टीक्षेपात असताना, लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, जो आपण यापूर्वीही दाखवला आहे. अशा वेळी देशविरोधी अफवा पसरवल्या जातात. मात्र राजकीय पक्षांनी जनतेला अफवांपासून वाचवायला हवे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. केंद्र आणि राज्याची पथकं लस वितरणाची तयारी करत आहेत. आमच्याकडे अनुभवी नेटवर्क सज्ज आहे. लस वितरणासाठी राष्ट्रीय तज्ज्ञ गट नावाचा एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असेही मोदींनी सांगितले. (COVID vaccine will be ready in the next few weeks hints PM Narendra Modi)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment