ब्रिटनमध्ये Pfizer-BioNTechच्या कोरोना लशीला मंजुरी, परवानगी देणारा जगातील पहिलाच देश

लंडन । करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या ब्रिटनने Pfizer-BioNTechच्या लशीला मंजुरी दिली आहे. फायजरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत समोर आले होते. आता पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. योग्य चाचणी केल्यानंतर लशीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटले.

फायजरने विकसित केलेली करोना लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. फायजर कंपनी ही करोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. ही करोनाच्या विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. फायजरच्या लस चाचणीचा संपूर्ण डेटा येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जाते.

येत्या काही दिवसात ब्रिटनमध्ये १० दशलक्ष लस उपलब्ध होणार असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ही लस mRNAलस आहे. ही लस शरीरात प्रोटीन निर्माण करते, त्यातून प्रोटेटिव्ह अॅण्टीबॉडी तयार होते. त्यामुळेच डीप-फ्रीज उत्पादन, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कची अधिक आवश्यकता आहे. जेणेकरून लस अधिक वेळ टिकू शकते. लस वितरणातील अडचणींवर मात करणार असल्याचे हँकॉक यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेत फायजरने याआधीच आपात्कालीन परिस्थितीत लस वापरासाठी मंजुरी देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. पुढील महिन्यात लशीबाबतच्या समितीची बैठक पार पडणार असून फायजरच्या लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अमेरिकेत ११ किंवा १२ डिसेंबरपासून लस उपलब्ध होण्यास सुरुवात होईल असे संकेत व्हाइट हाउसमधून देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like