चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो पसरला आहे. यामुळे आतापर्यंत सहा लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संक्रमित लोकांची संख्या ही जवळपास 1.46 कोटींवर पोहोचली आहे. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात चीनची ही लस यशस्वी ठरली आहे. हा निकाल द लान्सेट मासिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ते मानवांसाठी सुरक्षित आहे, असा शास्त्रज्ञांनी दावा केलेला आहे. हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासही उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे. चला तर मग या लसीबद्दल जाणून घेऊयात…

या चीनी लसीचे नाव Ad5 असे आहे. द लान्सेटच्या अहवालानुसार त्याची वुहान या शहरातच चाचणी घेण्यात आली, तेथूनच कोरोना विषाणू जगभर पसरला. या लसीच्या परिणामाचा तपास हा सर्व वयोगटातील लोकांवर केला गेला असून या तपासणीत असे दिसून आले आहे की ही लस सर्व वयोगटातील कोरोनाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरत आहे.

बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोफेसर वेई चेन यांच्या मते, कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्ध लोकांना असतो, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते किंवा ते आधीच कोणत्याना कोणत्या आजाराने ग्रासलेले असतात. या प्रकरणात, या लसीच्या दुसर्‍या टप्प्यातील निकाल चांगले आले आहेत. या लसीच्या मदतीने बरेच वृद्ध बरे झाले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढली आहे.

चिनी वेबसाइटच्या मते, पहिल्या टप्प्यापेक्षा दुसर्‍या टप्प्यात चार पट अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, जेथे 108 निरोगी लोकांची चाचणी घेण्यात आली, तिथे दुसऱ्या टप्प्यात, एकूण 508 लोकांची चाचणी घेण्यात आली. चीनच्या जिआन्शु प्रांतिक केंद्र, रोग नियंत्रण व प्रतिबंधक विभागाचे प्राध्यापक फेंगकाई झू यांच्या म्हणण्यानुसार 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांचा या चाचणीसाठी समावेष केला गेला.

दुसरीकडे, ब्रिटनलाही कोरोनावरील लस तयार करण्यात मोठे यश मिळाले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचे चांगले परिणाम समोर आलेले आहेत. हे मानवांसाठी सुरक्षितही असल्याचे म्हटले जात आहे. असा दावा केला जात आहे की, या मानवी चाचण्या दरम्यान, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, या लसीमुळे कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रुग्णांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. या लसीला ChAdOx1 nCoV-19 असे नाव देण्यात आले आहे.

अहवालानुसार युकेच्या या लसीच्या मानवी चाचण्यांमध्ये 1077 जणांचा समावेश होता. यामध्ये, ज्या लोकांना ही लस देण्यात आली त्यांना कोरोना विषाणूविरूद्ध लढणार्‍या पांढऱ्या रक्त पेशी आणि अ‍ॅटीबॉडीज विकसित होण्याचे पुरावे सापडले आहेत. या लसीच्या आता मोठ्या प्रमाणात मानवी चाचण्यांसाठी तयारी सुरू आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, यूके सरकारने या लसीचे 10 कोटी डोस तयार करण्याचे आधीच आदेश दिलेले आहेत.

चीन आणि ब्रिटन व्यतिरिक्त 27 जुलैपासून अमेरिकेतही एक मोठी मानवी चाचणी सुरू होणार आहे, ज्यामध्ये सुमारे 30,000 लोकांना या लसीचे डोस देण्याचे लक्ष्य आहे. ही लस मानवी शरीरात कोरोना विषाणूंपासून प्रत्यक्षात रक्षण करू शकते की नाही हे या चाचणीद्वारे निश्चित केले जाईल. डॉ. फौची यांच्या सहका-यांनी राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि मॉडर्ना इंक येथे ही लस विकसित केली आहे.

रशियानेही कोरोनावरील लस बनविल्याचा दावा केला आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदीम तारासोव यांच्या मते, जगातील पहिल्या कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. असा दावा केला जात आहे की जर सर्व काही व्यवस्थित झाले तर सप्टेंबरपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment