Wednesday, February 8, 2023

काॅटेज हाॅस्पीटल : उपसंचालकांच्या लेखी आश्वासनानंतर प्रहारचे मनोज माळी यांचे उपोषण स्थगित

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर करुन गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी. यासाठी प्रहारच्या माध्यमातून मनोज माळी यांनी मंगळवार (दि.२१) पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजीव कदम यांनी तातडीने बैठक घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत चर्चा केली. व तत्काळ गैरसोयी दुर करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यामुळे मंगळवारपासून होणारे आमरण उपोषण तात्पुरते स्थगीत करीत असल्याचे मनोज माळी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisement -

सातारा येथे झालेल्या बैठकीला उपसंचालक डॉ संजीव कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, नामदार बच्चू कडू यांचे स्विय सहाय्यक गौरव जाधव व मनोज माळी उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त तज्ञ डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची पदे भरावीत. एम. आर. आय मशिन व तज्ञ, सिटी स्कॅन मशिन व तज्ञ उपलब्ध करावे. ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड मंजूर करावे. या मागण्यासाठी मनोज माळी प्रहारच्या माध्यमातून 21 पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

यावर, बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. एन. एन. एम. अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात एम डी मेडिसिन, फिजिशियन व ऑर्थोपेडिक सर्जन ही पदे 15 दिवसांच्या आत भरण्याच्या सूचना डॉ. संजीव कदम यांनी दिल्या. तर भुलतज्ञ थोड्या दिवसात हजर होणार असल्याचे सांगितले तसेच सिटी स्कॅन मशीन व तज्ञ व सोनोग्राफी मशीन साठी रेडिओलॉगिस्टिक 2 महिन्यात उपलब्ध करून देण्याचे उपसंचालक डॉक्टर संजीव कदम यांनी दिले आहेत. मनोज माळी यांच्या अन्य मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात येणार्या गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी तिथल्या सर्व गैरसोयी दुर करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे डॉ. संजीव कदम यांनी सांगितले.

आंदोलन स्थगित, मागे नाही

उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत यापूर्वी ही उपोषण केले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनातील अर्ध्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली आहे. आताही गैरसोयी दुर करण्याचे उपसंचालकांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे मंगळवारपासूनचे उपोषण स्थगित करण्यात येत आहे. मात्र आश्र्वासनानुसार पुर्तता झाली नाही, तर पुन्हा निवेदन न देता आमरण उपोषण करण्याचा ईशारा मनोज माळी यांनी दिला आहे.
ना. बच्चुभाऊंच्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांना भेटणार. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत नामदार बच्चू कडू यांचे माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे गौरव जाधव यांनी सांगितले.