बनावट नोटा रॅकेटचा पर्दापाश : सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दोघासह सहा जणांना अटक, 32 लाख 67 हजारांच्या नोटा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी | बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात निगडी पोलिसांना यश आले. याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणात सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दोघांसह वसई व गुजरातमधील संशयितांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील संशयिताला पाटण तालुक्यातील ढेबवाडी तर सोलापूर जिल्ह्यातील संशयिताला पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथून ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात गोरख दत्तात्रेय पवार (वय 30, रा. भाळवणी, ता. पंढरपूर), विठ्ठल गजानन शेवाळे (वय 38, रा. ढेबेवाडी, ता. पाटण), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (वय 36, रा. संकेश्वरनगर, नालासोपारा पूर्व, वसई), राजू ऊर्फ रणजित सिंह फतुभा परमार (वय 38), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (वय 26), किरण कुमार कांतिलाल पटेल (वय 38, तिघे रा. गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, निगडीतील ओटास्कीम येथे एकजण बनावट नोटा घेऊन येणार होता. त्यानुसार, 23 जूनला सापळा रचून पंढरपूर तालुक्यातील गोरख पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 50 बनावट नोटा आढळल्या. तसेच त्याच्या दुचाकीच्या डिकीत 2 हजारच्या नोटांचे चार बंडल होते. या नोटांचे एका बँकेकडून परीक्षण केले असता नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडील 5 लाख 86 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच त्याच्या पंढरपूर येथील घरातून 5 लाख 23 हजारांच्या नकली नोटा जप्त केल्या. गोरखला या नोटा त्याचा मित्र पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील विठ्ठल शेवाळे याने दिल्याचे समोर आले.

त्यानुसार शेवाळेला ढेबेवाडी गावातून ताब्यात घेत त्याच्याकडून 3 लाख 70 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. शेवाळेने या नोटा जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस जितेंद्रच्या घरी गेले असता त्याला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी 1 जुलैला जितेंद्र याला न्यायालयातून वर्ग करून घेतले. जितेंद्रने त्याचा गुजरात येथील साथीदार राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी बनासकाठा जिल्ह्यातील पालनपूर येथे जाऊन परमारला अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 93 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. आरोपी परमार याने बनावट नोटा जितेंद्रकुमार व किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यांना घरून ताब्यात घेतले.

Leave a Comment