दोन युवतींवर तळबीड पोलिसात गुन्हा : रेल्वेत नोकरीच्या अमिषाने साडेपाच लाखाची फसवणूक

कराड | बेलवडे हवेली (ता. कराड) येथील युवकास रेल्वेत नोकरी लावतो म्हणून दोन युवतीनी वेळोवेळी तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात संजीवनी निलेश पाटणे (रा. निगडी, पुणे) व माधुरी संदिपान पवार (रा. बेलवडे हवेली, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवतींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चंद्रकांत परशुराम पवार हे बेलवडे हवेली येथे राहण्यास आहेत. तर चैतन्य चंद्रकांत पवार (वय-22) हा त्यांचा मुलगा आहे. त्याचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान बेलवडे हवेली गावातीलच माधुरी संदीपान पवार ही 3 वर्षांपूर्वी रेल्वे पोलीसमध्ये भरती झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चैतन्य पवार याच्या नोकरीविषयी चंद्रकांत पवार यांनी माधुरी पवार यांना सांगितले. त्यावेळी माधुरी पवार हिने तुमच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावतो, परंतु त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

यादरम्यान तीने आपली मैत्रीण संजीवनी निलेश पाटणे हिची रेल्वे अधिकारी म्हणून चंद्रकांत पवार यांना ओळख करून दिली. चंद्रकांत पवार यांनी माधुरी पवारच्या बोलण्यावर विश्वास ठेवून डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 या दरम्यान दोघींनी वेळोवेळ 5 लाख 45 हजार रुपये संजीवनी पाटणेच्या निगडी येथील अॅक्सिस बँकेच्या खात्यावर एनएफटी द्वारे भरण्यास सांगितले. त्यानुसार खात्यावर पैसे भरल्यानंतर दोघींनीही ते पैसे काढून घेतले. त्यानंतर चंद्रकांत पवार यांनी नोकरीबाबत विचारणा केली असता दोघींनी टाळाटाळ केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंद्रकांत पवार यांनी त्याबाबतची फिर्याद तळबीड पोलीस ठाण्यात दिली. सदरचा तपास तळबीड पोलीस ठाण्याच्या सपोनि जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय काळे करत आहेत.

You might also like