किरकोळ वादातून तरुणाने केली वृद्ध आईची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | कल्याणच्या पश्चिम भोईवाडा भागातील गफूर मंझिल इमारतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमन मुल्ला या तरुणाने किरकोळ वादातून आपल्याच वृद्ध आईला जीवे मारल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. लाटनं आणि इतर लाकडी वस्तूंचा वापर करून अमनने आपल्या आईच्या डोक्यात जोरदार घाव घातल्याचं पोलिसांना प्रथमदर्शनी पाहणीत दिसून आलं आहे.

रुकसाना मुल्ला असं मृत वृद्धेचं नाव असून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांना तपास करताना लक्षात आलं. रुक्साना यांचा मुलगा अमन मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अमन याचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.

पोलीस चौकशी सुरू असताना इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. खून केल्यानंतर अमनने पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तो मोठमोठ्याने ओरडत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली आणि त्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही केली. अमनला पुढील तपासणीसाठी दवाखान्यात पाठवण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment