सांगलीत अवैधरित्या शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश; ३ पिस्तुले, ५ जिवंत काडतुसे जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करून टोळीच्या म्होरक्यास ३ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसासह ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला नवीन गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे गुन्हे दाखल आहेत. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेला, तसेच अवैधरित्या हत्यारे बाळगणाऱ्या व विकणाऱ्या टोळ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधिक्षक मनीषा डुबुले यांनी केल्या होत्या.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक सांगली शहरात गस्त घालत असताना एकजण सिव्हिल हॉस्पिटल ते एसटी स्टॅन्ड परिसरात हत्यारे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावला. त्यांना सम्राट व्यायाम मंडळाजवळ एक संशयित आढळला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ असणाऱ्या सॅकमध्ये ३ पिस्तुले व ५ जिवंत काडतूस सापडली. अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव नवीन गायकवाड असे सांगितले.

सांगली जिल्ह्यात हत्यारे विकण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील बेकायदा शस्त्रे विक्री व बाळगणे या गुन्ह्यात तो पोलिसाना हवा असल्याचे समजले. त्याच्या साथीदारांना २०१९ मध्ये अवैधरित्या शस्त्रांची विक्री करण्यासाठी आले असता त्यांच्याकडून १ गावठी कट्टा, १ पिस्तूल आणि ५ काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या गायकवाड याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड याच्यावर मध्यप्रदेश व महाराष्ट्रात गुन्हे दखल असून त्याचे साथीदारही रेकॉर्डवरचे आहेत. त्याच्याकडून अजून गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment