सोळवंडे खून प्रकरणातील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करणार – पोलीस अधिक्षक धीरज पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील बुधवार पेठेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन दीपक सोळवंडे याच्या खुनप्रकरणी पोलिसांनी आठजणांना अटक करून त्यांना गुरूवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता आठही जणांना दि. 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयितांनी पिस्तुले कोठून आणली, खूनामध्ये वापरण्यात आलेली गाडी कोणाची आहे.

यामध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे. खून झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाल्यानंतर त्यांना आश्रय कोणी दिला. या सर्व बाबींचा कसून तपास सुरू आहे. या संपूर्ण टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी दिली.

पवन दीपक सोळवंडे याचा मंगळवारी मध्यरात्री गोळ्या झाडून खून झाला. जुनेद शेख व त्याच्या साथीदारांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रभात टॉकीजच्या आवारात हवेत गोळीबार करून दहशत माजवली होती. पवन दिसताच जुनेदने त्याच्यावर गोळीबार केला. जुनेदच्या अन्य साथीदारांनीही पवनवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पवन जागीच ठार झाला.

या घटनेने तीन दिवस शहरात तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी पोलिसांनी ज्यादा बंदोबस्त शहरात लावून शहर पूर्वपदावर आणले. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणोशोत्सव, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराडातील गुन्हेगारी मुळापासून नष्ट करण्याच्या हेतूने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

पवन सोळवंडेचा खून करणार्‍या टोळीसह इतर पाच टोळ्यांवरही मोक्कातंर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी दिली.

Leave a Comment