गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने वर्तविला आहे.

पोलीस दलाचे सी-60 जवान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. दरम्यान मोठ्या संख्येने लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार केल्याने वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळावर सर्चींग ऑपरेशन राबविले.

तेव्हा घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले. यामध्ये चार रायफल,पिटु, क्लेअर माईन व भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचे साहित्य आढळून आल्याने नक्षलवाद्यांचा डाव उधळण्यात पोलिस विभागाला यश आले. या घटनेत काही नक्षलवादी जखमी असल्याचा संशय पोलीस विभागाने वर्तविली असून या परिसरात नक्षल विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Leave a Comment