खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्यात मोठा स्फोट; २ जण ठार, १ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड । रायगड जिल्ह्यातील खोपोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात सोमवारी मध्यरात्री रात्री झालेल्या स्फोटामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट भयंकर होता. दोघांच्या शरीराचे तुकडे झालेत. यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येईल. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. परंतु गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. कच्चे लोखंड भट्टीत वितळवून टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यात मृत्यू झालेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर अक्षरश: हादरून गेला.

दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५) व प्रमोद दूधनाथ शर्मा (३०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, सुभाष धोंडीबा वांजळे (वय ५५) असं जखमी कामगाराचं नाव आहे. मृत कामगारांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. तर, जखमी सुभाष वांजळे यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंडिया स्टील ही खोपोलीतील जुनी व मोठी कंपनी आहे. भंगारमधील लोखंड वितळवण्याचे काम येथील कारखान्यात चालते. यापूर्वीही काही वेळा येथे लहान मोठे स्फोट झाल्याचे सांगितले जाते. स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस व अन्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment