भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे चीन सैन्याला होते पूर्वादेश – अमेरिकी गुप्तचर यंत्रणा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय बिहार १६ रेजिमेंटचे सैनिक आणि चीनी सैनिक यांच्यात एका चौकीवरून चकमक झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहिद झाले. ज्यात कमांडर ऑफिसर संतोष बाबू यांचा समावेश होता. आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने चीनला भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे पूर्वादेश होते अशी माहिती दिली आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या या हल्ल्यामुळे सध्या दोन्ही देशांत तणावाचे वातावरण असताना ही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चीनचेही काही सैनिक मारले गेल्याचे आता चीनने कबुल केले आहे. जनरल झाओ यांनी हे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेने दिलेल्या अहवालामध्ये सूत्रांच्या हवाल्याने माहिती समोर आली आहे, या माहितीनुसार चीनच्या पश्चिम थिएटर कमांडचे प्रमुख जनरल झाओ जोंगकी यांनी गलवान खोऱ्यात हल्ल्यासाठी परवानगी दिली होती. जनरल झाओ काही मोजक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत जे अद्यापही पिपल्स लिबरेशन आर्मीमध्ये कर्तव्य बजावत आहेत. झाओ आधीपासूनच भारतासोबतच्या वादांवर लक्ष ठेवले आहे. त्यांना भारतावर हल्ला करून भारतीयांना धडा शिकवायचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. झाओ यांनी याआधी चीनला चेतावणी देताना भारत, अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून शोषण होऊ नये याकरिता चीनने दुबळं दिसता कामा नये असं म्हटलं होतं.

सुरुवातीला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय जवानांनी चिनी सैनिकांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. मात्र या हल्ल्यातून आम्ही किती सक्षम आहोत हे दाखवायचे होते म्हणून हा हल्ला केल्याचे अमेरिकी गुप्तचर संस्थेने सांगितले आहे. मात्र चीनला उलटेच परिणाम भोगावे लागले असल्याचे देखील समोर आले आहे. चीनने सोमवारी पहिल्यांदा सैनिक मारले गेले असल्याची कबुली दिली आहे. मात्र त्यांनी आकडा न सांगता केवळ २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचे सांगितले आहे. पण ही सुद्धा चीनची खेळी आहे असे म्हंटले जात आहे. या हल्ल्यानंतर भारतात मात्र चीनविरुद्ध निषेधार्थ चीनी उत्पादनांवर बंदी घालण्याचे आंदोलन उदयास आले आहे.

Leave a Comment