“नथुरामां”ची भरती कशी होते”? – थर्ड अँगल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल | कुणाल शिरसाटे

विचारवंतांच्या हत्या करण्यात आरोपी म्हणून पकडलेले सर्व तरुण हे वय वर्ष १८ ते ३० दरम्यानचेच आहेत. त्यांची पार्श्वभूमी पहिली तर ते ओबीसीच्या छोट्या जातींमधून येतात, काबाडकष्ट करणाऱ्या वर्गातून ते येतात. ब्रेनवॉश केलेल्या या तरुणांना हत्या करण्यासाठी नथुराम गोडसे चा आदर्श समोर ठेवला जातो… राम, नरसिंह आणि अर्जुनाचा आदर्श ठेवला जातो…. हे सारं विष पेरण्याची सुरवात कुठून होते? ही पोर हत्यांचे कट रचणाऱ्या संस्थांच्या तावडीत सापडली कशी?

ही सन २०११ ची गोष्ट असेल मी पुण्यात एम.ए च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता आणि गोखलेनगरला राहत होतो. कैलास आणि सुदर्शन असे माझे दोन रूम पार्टनर होते, दोघेही कर्नाटक मधील होते आणि पहिल्यांदाच पुण्यात जॉब करण्यासाठी आलेले होते.

दिवस गणेशोत्सवाचे होते, कैलास आणि सुदर्शन आपण गणेशोत्सव बघायला जाऊ म्हणवून आग्रह करत होते.आम्ही जायचं ठरवलं, सगळीकडे असलेल्या सजावटी आणि गणेशमूर्ती बघून आम्ही बाजीराव रस्त्यावरून एस.पी. कॉलेजच्या दिशेने निघालो.

वाटेत उद्यानप्रसाद कार्यालयाच्या बाहेर कमान लावलेली होती त्यावर पिवळ्या कापडी बॅनर वर हिंदू जनजागरण समिती आणि धर्म जागृती प्रदर्शन असे काहीतरी लिहिलेले होते.

नेमकं काय धर्म जागृती म्हणून आम्ही बघायला जायचं ठरवलं, उद्यान प्रसाद कार्यालयाचे गेट मोठे आणि लंबूळके आहे, दोन्ही बाजूला सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचे बोर्ड लावलेले होते. आत दोन भागात रचना केली होती एक हॉल आणि त्यात कापडी पडदे बांधून आतील बाजूस एक हॉल, त्या हॉलचे तोंड उद्यान प्रसाद कार्यालयात उजव्या कोपऱ्याला असलेल्या वधू वराच्या रूम कडे उघडत होते. बाहेर जाताना अनेक टेबल मांडलेले होते ज्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध, मंदिर अधिग्रहण कायद्याला विरोध आणि सनातनची नोंदणी, हिंदू जनजागरण समितीचे सदस्य नोंदणी चालू होती.

प्रदर्शनात जाताना समोर एका देवाचा फोटो होता, आत जाणाऱ्या प्रत्येकाला गंध लावायचाच होता. डाव्या बाजूने आत दोन्ही बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवा, तात्या टोपे अश्या सगळ्यांचे फोटो लावून त्याच्याखाली त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले असे दोन दोन वाक्य लिहिले होते.

तरुण मुलांचा ग्रुप आला की, एक हट्टाकट्टा तरुण तावतावात या लोकांनी धर्मासाठी रक्त सांडलं, धर्मयुद्ध केलं अस सांगत होता आणि वारंवार आजचे हिंदू म्हणजे आपण षंढ आहोत हे अधोरेखित करत होता.

अनेक टीन एजची मुले त्याचे ऐकून उसळत होते, घोषणा देत होते. तो जे जे विष त्या मुलांच्या मनात टाकत होता त्याचा परिणाम होत होता. मुस्लिम लोकांनी किती अनन्वित अत्याचार केले हे तो तरुण डोळ्यात पाणी आणि मग जरा रागावून सांगत होता, त्याच्या या अभिनयाचा परिणाम त्या मुलांवर दिसू लागला. आमच्या घोळक्याच्या मागे मध्यमवयीन दोन कार्यकर्ते उभे होते, ते तरुणांच्या प्रतिक्रिया पाहून त्यांना हेरत होते. अश्या सगळ्या समाजासाठी महान कार्य करणाऱ्या लोकांचा वापर ही मंडळी मुस्लिमद्वेष तयार करण्यात करत होते.

मग तिथून आतील बाजूस जोडलेल्या हॉलमध्ये आम्ही गेलो तिथे मंदिर अधिग्रहण, मंदिरे कशी तोडतात, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कसा हिंदू धर्माच्या विरोधात आहे वैगेरे वैगेरे पोस्टर लावलेले होते. आणि त्या अनुषंगाने तो तरुण आज आपण हिंदू म्हणून काय क्रांतिकार्य केले पाहिजे ते सांगत होता.

तरुण आता पुरते ब्रेनवॉश झाले होते. हा सगळा प्रदर्शनाचा आणि पोस्टर दाखवत भाषणाचा कार्यक्रम तब्बल 30 मिनिटं चालला.

तरुण एकमेकांमध्ये मुस्लिम कसे नालायक आहेत, गांधींना कशी देशाची वाट लावली याची चर्चा करू लागले. या तरुण मुलाचे प्रदर्शन दाखवायचे काम संपले तो पुन्हा पुढे निघून गेला. तेवढ्यात आम्ही बाहेर जायला निघणार तेव्हा तिथे उभे एक वयस्कर काका आम्हाला हात जोडून विचारू लागले की तुम्हाला आवडलं का प्रदर्शन? मी पण आपलं हो हो छान छान अस म्हणून हात जोडले.

ते काका म्हणाले की आम्ही या रूम मध्ये एक फिल्म लावली आहे अजून फार वेळ नाही फक्त 10 मिनिटांची आहे बघा म्हणून आम्हा 7-8 तरुणाना एका रूम मध्ये घेऊन गेले जिथे टीव्हीवर काश्मीर मधील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराची फिल्म लावली होती.

सुदर्शन ते पाहून म्हणाला की, ये सचमूच मे सच है क्या?
मी म्हणालो, प्रॉपगंडा कर रहे है|
पण तिकडे असलेले तरुण मात्र पूर्णपणे भावविवश होऊन ते पाहत होते. फिल्म संपली. काका आत आले म्हणाले “मला माहित आहे की हिंदूंचा हा देश असून त्यांच्यावर होणारा अत्याचार तुम्हाला आवडला नसणार तुम्हाला खूप राग आला असेल, तुम्हाला काहीतरी करावं वाटत असेल”
लगेच दोघे तिघे बोलले की “हो हो”
मग ते काका म्हणाले की शेजारच्या रूम मध्ये आमचे काही साधक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला, तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी काय करू शकता आम्ही तुम्हाला काय मदत करु शकतो याबाबत अजून तुमचे 5 मिनिटे द्या.”

मला आता त्यांचा प्लॅन काहीसा घातक वाटू लागला, उत्सुकता म्हणून आम्ही तिघेही त्या खोलीत गेलो, तिकडे तीन टेबलवर तीन साधक बसले होते. त्यांच्या समोर खुर्च्या होत्या आम्हाला त्यातील एका साधका समोर बसवले आणि आमचा संवाद सुरू झाला-

साधक -” तुम्ही फिल्म पाहिली त्यात हिंदूंवर किती अत्याचार होतो ते तुम्हाला लक्षात आलच असेल, तुम्हाला काय वाटत”

सुदर्शन आणि कैलास बोलण्याआधी मी बोललो
“कश्मीरमध्ये जे पंडित लोकांच्याबाबत घडलं ते खूप दुर्दैवी आहे, त्याची भरपाई त्यांचे योग्य पूर्णर्वसन करून केली पाहिजे”

साधक रागावला – “तुम्ही हिंदू नाही का तुम्ही डोक्याला गंध का लावला नाही”

मी – ” मी हिंदूच आहे पण गंध लावलाच पाहिजे अस काही माझं मत नाही, तुम्ही जबरदस्ती पण नाही करू शकत”

मग त्याने मोर्चा सुदर्शन आणि कैलास कडे वळवला.
साधक – ” हे खरे हिंदू नाहीत, खरे हिंदू असते तर यांचे रक्त उसळले असते, यांच्यासारख्या षंढ हिंदुमुळे हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचार होतोय…. आपण जशास तसे उत्तर दिले पाहिजे”

कैलास आणि सुदर्शन यांना मुद्दा पटला असावा त्यांनी मान हलवली. त्यामुळे ते आता गळाला लागले असं साधकाला वाटलं,
तो म्हणाला- ” आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आम्ही युवकांच एक पथक तयार करणार आहे, तुमच्या सारख्या तरुणांची त्यात गरज आहे, तुमचा नंबर द्या,

त्याने नंबर लिहून घेतला, आमचा साधक तुम्हाला कॉल करेल, तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात आपण सगळे जमणार आहोत तिकडे पुढे धर्मरक्षणासाठी काय काय करता येईल याची चर्चा करणार आहोत, जे चांगले तरुण असतील तर आम्ही प्रशिक्षण पण देऊ म्हणजे आपल्याला आपलं पण रक्षण करता येईल हिंदुद्रोही लोकांपासून”

मी – “हिंदुद्रोही? म्हणजे नेमकं काय करायचं तिकडे येऊन? आपण इतर धर्माचा द्वेष करू नये असं माझं म्हणणं आहे, गांधी, नेहरू आंबेडकर यांनी मिळून देश उभा केला हा”

साधकाचा चेहरा बदलला, उगाच माहिती दिली अस त्याला वाटू लागलं आणि तो अधिक चिडला- “या देशात एकच खरा देशभक्त क्रांतिकारक होऊन गेला तो म्हणजे नथुराम गोडसे,
प्रत्येक हिंदू तरुणाने त्याचा आदर्श समोर ठेवून हिंदू धर्मासाठी कार्य केले पाहिजे, या मुस्लिम लोकांना पाकिस्तान साठी ज्या गांधीने ५५ कोटी दिले त्याला योग्य जागा फक्त नथुराम गोडसेंनी दाखवली”

साधक चिडला होता, तो गांधीजींचा एकेरी उल्लेख करत गोडसेंबद्दल आदरभाव दाखवत होता. काही लोकांना गोडसे आदर्श वाटतात अस फक्त ऐकून होतो, जे आज प्रत्यक्ष पाहून खेद वाटत होता,त्याचा वाढलेला आवाज ऐकून एक साधक माझ्या शेजारी येऊन बसला.

मी- “मग १९३४ पासून नथुरामने गांधींना मारण्याचा प्रयत्न का केला होता, पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा मुद्दा तेव्हा नव्हताच! तुम्हाला नथुराम हा क्रांतिकारक वाटतो आणि गांधीजी देशद्रोही वाटतात तुम्हाला इतिहास नीट शिकण्याची गरज आहे”

साधक -“इतिहास तुम्हाला माहीत नाही, या मुस्लिम लोकांनी हिंदू लोकांवर किती अत्याचार केले आणि या गांधीने त्यांना पाठीशी घातले (जी भाषा त्याने वापरली ती इथे देत नाही, भावार्थ हाच होता) हे मुस्लिम आजपण लव्ह जिहाद च्या नावाने आपल्या हिंदू मुलींचा वापर करतात, त्यांना मदरश्यात हे शिकवलं जातं, तुमच्यासारखे हिंदू हे खरे मूर्ख आहेत ज्यांना हे दिसत नाही”

मी – “लग्न करण हे व्यक्तिगत मत असत, माझ्या ओळखीचे अनेक हिंदू मुस्लिम लग्न आहे तिथे तर मला अस काही दिसलं नाही”

माझ्या शेजारी बसलेला साधक उसळला,
दुसरा साधक – “तुम्ही देणार का तुमची बहीण मुस्लिम माणसाला”

मी – ” ती जर मुस्लिम व्यक्तीशी प्रेम करत असेल आणि दोघेही लग्नाला तयार असतील तर मी त्यांना पाठिंबा देईल”

माझं हे मत त्या साधकाला आवडलं नाही, तो लालबुंद झाला आणि जागेवरून उठला आणि म्हणाला – “मी त्याला आणि बहिणीला दोघांनाही जिवंत ठेवणार नाही, माझ्यासाठी माझा हिंदू धर्म श्रेष्ठ आणि महत्वाचा आहे”

मी – “अहो, मी कुठे तुमच्या बहिणीबद्दल बोललो, मी माझं मत सांगितलं….”

त्यांनी माझा नाद सोडला आणि कैलास आणि सुदर्शनशी बोलू लागले. आमच्यातील चर्चा पाहून दोघेही गोंधळले होते.

त्या पहिल्या साधकाने त्यांना सांगितलं की आम्ही हिंदू धर्म रक्षणासाठी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे नथुराम सारख या पोरासारख नको यांच्यामुळे हिंदू धर्म मागे राहिला.

सुदर्शन आणि कैलास मान डोलवत बाहेर पडले, मी ही सोबत बाहेर आलो.
मनात शंकेची पाल चुककली कोणतं प्रशिक्षण आणि तरुणांच संघटन कशासाठी? करा पण मग बंद खोलीत चर्चा आणि ब्रेनवॉश कशाला? अनेक टिन एज मुले बळी पडले असणार! एकही तरुणी नाही फक्त तरुण मुलेच का असे अनेक प्रश्न पडू लागले.

तो दुसरा साधक आमच्या मागे एस.पी. कॉलेज मध्ये जाऊ पर्यन्त पाठलाग करायला आला. शंका अधिक दाट झाली.

जेव्हा दाभोलकरांचा खून झाला तेव्हा मला हाच प्रसंग आठवला होता. डॉक्टरांसोबत या प्रसंगाची चर्चा देखील झाली होती.

परशुराम वाघमारे, सचिन अणदूरे, शरद कळसकर यांच्यासारखी तरुण या दहशदवादी संघटनेच्या जाळ्यात अशीच सापडली असणार!

कुणाल शिरसाटे (9767599934)

Leave a Comment