नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । छत्तीसगड पोलिसांनी २०१२ मध्ये बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे केलेल्या बनावट चकमकीत १७ ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार केले होते, अशी धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी सात वर्षे सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल मागील महिन्यात सादर केला. मात्र, रविवारी हा अहवाल लीक झाला. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.

चकमकीत पोलिसांनी ठार केलेले लोक हे नक्षलवादी नव्हते, असे अहवालात म्हटले आहे. बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे चकमक घडविण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांकडून गोळीबार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र ग्रामस्थांकडून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा होता. ज्या गटांवर गोळीबार केला ते नक्षलवादी होते याचा कोणताही पुरावा सुरक्षा दलांना देता आलेला नाही, असेही चौकशीत अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा अहवाल न्यायमूर्ती अग्रवाल यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वी १७ ऑक्टोबर रोजी सरकारला सादर केला होता. हा अहवाल गेल्या शनिवारी रात्री छत्तीसगड कॅबिनेटसमोर मांडण्यात आला. तर हा अहवाल काल, सोमवारी विधानसभेत सादर करण्यात आला. पोलिस तपास सदोष असून त्यात छेडछाड करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून बंदुका आणि गोळ्या जप्त केल्याच्या पोलिसांच्या दावा फेटाळून लावण्यात आला आहे.

या प्रकरणी ॲड. इशा खंडेलवाल यांनी पीडितांची बाजू मांडली. हा न्यायासाठी ग्रामस्थांचा लढा होता. अखेर न्याय मिळेल असे दिसते. आपण या प्रकरणाचा चौकशी अहवाल सोशल मीडियावर पाहिला. मात्र, अद्याप आपल्याला तसेच ग्रामस्थांना याची प्रत मिळालेली नाही, असे खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

Leave a Comment